Endometriosis स्थिती नक्की काय असते, तज्ज्ञांची माहिती (फोटो सौजन्य - iStock)
एंडोमेट्रिओसिस ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये गर्भाशयाच्या अस्तराशी साधर्म्य असलेल्या उती गर्भाशयाच्या बाहेर वाढू लागतात. जगभरातील सुमारे १० टक्के स्त्रियांवर या समस्येचा परिणाम होतो व पाळीच्या दिवसांत, लैंगिक संबंध ठेवताना, शौचास जाताना आणि/ किंवा लघवी करतेवेळी जाणवणाऱ्या तीव्र, संपूर्ण जीवनमान कोलमडून जावे इतक्या गंभीर वेदना, ओटीपोटामध्ये दीर्घकाळ दुखणे, पोट फुगणे, मळमळणे, थकवा आणि काही वेळा नैराश्य, चिंता आणि वंध्यत्व ही याची लक्षणे असल्याचे बिर्ला फर्टिलिटी अँड आयव्हीएफच्या फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. प्रियांका शहाणे यांनी सांगितले.
ही समस्या सर्वत्र आढळून येत असली तरीही अनेक स्त्रिया निदान होण्यापूर्वी कित्येक वर्षे वेदना सहन करत राहतात व स्त्रीचा राहता देश व तेथील आरोग्यसेवा यंत्रणेची उपलब्धता यांनुसार या आजाराचे निदान होण्यास सरासरी ६.६ ते २७ वर्षांपर्यंतचा काळ जाऊ शकतो, असे युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्कने केलेल्या संशोधनातून असे आढळून आले आहे
निदानातील अडथळे
एंडोमेट्रिओसिस होण्याचे नेमके कारण अद्यापही अज्ञात आहे, त्यामुळे त्याचे नेमके निदान होणे अधिकच कठीण बनते. इतर आजारांमध्येही आढळून येणारी समान लक्षणे, स्त्री-रोगाशी निगडित शरीरस्वास्थ्याशी जोडलेली सामाजिक शरमेची भावना व खुल्या चर्चेचा अभाव यामुळे बरेचदा स्त्रिया आपल्या स्वास्थ्याविषयी उघडपणे बोलण्यापासून परावृत्त होतात. अऩेक स्त्रियांनी योग्य निदान होण्याआधी अनेक डॉक्टरांकडून तपासणी करून घेतलेली असते, यात काही वेळा त्यांच्या लक्षणांवरून चुकीच्या आजाराचे निदान केले जाते किंवा योग्य निदान होत नाही. शिवाय रुग्णांकडून सांगितली गेलेली लक्षणे नेहमीच बारकाईऩे नोंदवून घेतली जात नाहीत, यामुळेही निदानाच्या प्रक्रियेला विलंब होतो.
Vaginal Bleeding: योनीतून रक्तस्राव होणे कधी असते सामान्य? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सांगितले तथ्य
एंडोमेट्रिओसिसचा जीवनमानाच्या दर्जावर होणारा परिणाम
एंडोमेट्रिओसिसमध्ये सरसकट आढळून येणारी तीव्र वेदना किंवा थकव्यासारखी लक्षणे बरेचदा स्त्रियांच्या दैनंदिन आयुष्यात, कामामध्ये आणि जोडीदाराशी असलेल्या संबंधांमध्ये अडथळा आणतात. एंडोमेट्रिओसिस असलेल्या स्त्रियांपैकी ५२ टक्के स्त्रिया या समस्येचे आपल्या नोकऱ्यांवर आणि वैयक्तिक नात्यांवर लक्षणीय परिणाम होत असल्याचे नोंदवतात, असे काही अभ्यासांतून दिसून आले आहे. मानसिक आरोग्य हा त्यांच्या आयुष्याचा आणखी एक भाग या समस्येमुळे प्रभावित होतो, कारण यामध्ये स्त्रिया सामाजिक लांच्छनाला, समाजापासून अलग पडण्याला सामोऱ्या जातात व त्यांच्या जीवनमानाचा दर्जा खालावतो.
एंडोमेट्रिओसिसचा प्रजननक्षमतेवर होणारा परिणाम
गर्भधारणेशी संबंधित आव्हाने हा आणखी एक लक्षणीय प्रश्न आहे, कारण एंडोमेट्रिओसिस असलेल्या ३० टक्के ते ५० टक्के स्त्रियांना वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करावा लागतो. प्रजनन स्वास्थ्याशी निगडित दोषांमुळे उतींना व्रण पडणे (स्कारिंग), एकमेकांना चिकटणे (अॅडहेशन्स) आणि द्रवाने भरलेल्या गाठी (सिस्ट) तयार होणे या समस्या निर्माण होऊ शकतात, ज्या प्रजननकार्यामध्ये अडथळा आणू शकतात व बहुतेकवेळा गर्भधारणा होण्यात अडचण येऊ लागते तेव्हाच या स्थितीचा शोध लागतो.
एंडोमेट्रिओसिसमुळे होणारे परिणाम गंभीर असूनही त्या तुलनेत आजार प्रदीर्घ काळापासून गैरसमजूतींच्या जाळ्यात अडकलेला दिसतो व त्याच्याकडे पुरेसे लक्ष दिले गेलेले दिसत नाही. एखाद्या स्त्रीला हा आजार असल्याचे निदान होईपर्यंत त्याचे खोल भावनिक व शारीरिक घाव तिने सोसलेले असतात. इथे गरज आहे ती वेळेवर निदान होण्याची, अधिक व्यापक जागरुकतेची आणि सहानुभूतीने व संपूर्ण माहितीनिशी केल्या जाणाऱ्या उपचारांच्या उपलब्धतेची, जेणेकरून कोणत्याही स्त्रीला सारे काही ठीक आहे हे दर्शविण्यासाठी मूकपणे वेदना सहन कराव्या लागणार नाहीत.