फोटो सौजन्य - Social Media
प्रत्येकाला चांगले मित्र, आपुलकीचे नाते आणि जवळची माणसं हवी असतात. पण कधी कधी आपल्याच स्वभावातील काही गुण नकळत नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतात. त्यात सर्वात मोठा अडसर ठरतो तो म्हणजे रागीट स्वभाव. सतत चिडचिड, टोमणे, ओरडण्याची सवय किंवा छोट्या गोष्टींवर संतापणे यामुळे लोकं हळूहळू दुरावू लागतात.
राग ही मानवी भावना आहे. ते दाबून ठेवणं योग्य नाही, पण वारंवार, अनियंत्रित राग हे नात्यांसाठी घातक ठरते. रागीट स्वभावामुळे केवळ कुटुंबातील नव्हे तर मित्र, सहकारी आणि समाजाशी असलेले संबंधही तुटतात. त्यामुळेच ‘आपण असंच आहोत, बदलणार नाही’ अशी हट्टी भूमिका न घेता एक छोटासा बदल केला तर नाती सुधारू शकतात.
‘रागावर त्वरित प्रतिक्रिया न देता थोडा वेळ घेणे’ एवढाच एक साधा बदल आयुष्य पालटू शकतो. जेव्हा कुठली गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही तेव्हा ताबडतोब ओरडण्याऐवजी १० सेकंद शांत राहा, खोल श्वास घ्या किंवा शक्य असल्यास त्या ठिकाणाहून थोडं दूर चला. या छोट्याशा पद्धतीमुळे राग कमी होतो आणि शब्दांमधून नाती बिघडण्याची शक्यता कमी होते.
जेव्हा आपण रागावर नियंत्रण ठेवायला शिकतो, तेव्हा नात्यांमध्ये उब वाढते. मित्र-परिवार आपल्याशी मनमोकळेपणे बोलू लागतो. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळतं. एकंदरित आपण ‘रागीट’ या टॅगमधून बाहेर पडतो आणि आपल्या स्वभावातील सकारात्मक बाजू इतरांना दिसू लागते.
लक्षात ठेवा, रागावर नियंत्रण ठेवणं म्हणजे राग दडपणं नव्हे. तर तो योग्य पद्धतीने व्यक्त करणं होय. थोडासा संयम, थोडी समज आणि थोडं आत्मपरीक्षण एवढंच केलं तरी नाती पुन्हा फुलू शकतात.