'लाडक्या बहिणी'मुळे अन्य खात्यांवर येतोय आर्थिक ताण; आता योजना बंद होणार का? मंत्री नाईक म्हणाले...
मुंबई : धनगरवाड्यांना रस्ते सुविधा देण्याबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांनी हा सवाल उपस्थित केला. या प्रश्नावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेमुळे इतर खात्यांवर ताण येत असल्याचे विधान केले. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, त्यांनी लगेचच योजनेला पाठिंबा असल्याचे स्पष्ट करत सारवासारव केली.
सतेज पाटील यांनी शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा आदी भागांतील धनगरवाड्यांना रस्ते नसल्याने नागरिकांना होणाऱ्या अडचणींकडे विधान परिषदेत लक्ष वेधले. यावर उत्तर देताना नाईक यांनी सांगितले की, फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे सुमारे १२ हजार कोटी रुपयांची सागाची संपत्ती उपलब्ध आहे. या संपत्तीच्या आधारे सहा हजार कोटींचे कर्ज उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. तसेच वन खात्याला निधी उपलब्ध झाल्यास हिरवे डोंगर, पर्यटन विकास, कर्मचाऱ्यांचे वेतन, आरएफओ-डीएफओ कार्यालयांची उभारणी तसेच वन्यजीव-मानव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करता येतील, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेवरही त्यांनी भाष्य केले. या योजनेमुळे इतर खात्यांवर ताण आणत आहे. मात्र, असे असले तरीही ती बंद होणार नाही, असे स्पष्ट करत नाईक यांनी सरकारच्या भूमिकेला दुजोरा दिला. लाडकी बहीण योजनेसाठी गेल्यावेळच्या अर्थसंकल्पात (२०२५-२६) तब्बल ३६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती.
सर्वाधिक निधी महिला, बालविकास खात्याला
लाडकी बहीण योजना महिला व बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत चालवली जाते. त्यामुळे अर्थसंकल्पात जेव्हा सर्व खात्यांसाठी निधीची तरतूद केली जाते, तेव्हा या खात्यांपैकी सर्वाधिक निधी हा महिला व बालविकास खात्याला दिला जात आहे. या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर पैसा लागत आहे. हा खर्च खूपच हाताबाहेर जात असल्याने सरकारने अनुसूचित जाती-जमातीच्या ज्या महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा आहे, त्यांना या समाजाच्या उन्नतीसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी समाजकल्याण विभागाला देण्यात येणाऱ्या निधीतूनच वळवला जात असल्याचे प्रकारही समोर आला आहे.
हेदेखील वाचा : मोठी बातमी ! भंडाऱ्यात तब्बल 15000 लाडक्या बहिणींचा अर्ज झाला बाद; हफ्ताही रखडला…






