Collagen Supplements Benefits for Skin
कोलेजन क्रीम आणि सप्लिमेंट्स सध्या अत्यंत लोकप्रिय झाले आहेत. मात्र, ते खरोखरच प्रभावी आहेत की केवळ मार्केटिंगचा एक ट्रेंड आहे, असा प्रश्न अनेकांना पडतो. आपल्या त्वचेमध्ये कोलेजन हे सर्वाधिक प्रमाणात आढळणाऱ्या प्रथिनांपैकी एक आहे. कोलेजन स्पंजप्रमाणे कार्य करते. ते त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते आणि त्यामुळे त्वचेला मजबुती, घट्टपणा आणि लवचिकता मिळते. वयानुसार शरीरातील कोलेजनचे प्रमाण कमी होत जाते आणि त्यामुळेच त्वचेवर बारीक रेषा आणि सुरकुत्या दिसू लागतात.सध्या बाजारात कोलेजन असलेली अनेक सप्लिमेंट्स तसेच क्रीम्स उपलब्ध आहेत. मात्र, यामध्ये किती प्रमाणात मार्केटिंगचा प्रभाव आहे आणि किती गोष्टींना वैज्ञानिक आधार आहे, याबद्दलची माहिती मुंबई येथील सैफी हॉस्पिटलचे, सल्लागार त्वचारोगतज्ज्ञ, डॉ. प्रवीण बनोडकर यांनी दिली आहे, जाणून घेऊयात.
कोलेजन क्रीम्सच्या बाबतीत विचार केला, तर त्वचेवर लावल्या जाणाऱ्या कोलेजनची सर्वात मोठी मर्यादा म्हणजे कोलेजनचे रेणू आकाराने खूप मोठे असतात. त्यामुळे ते त्वचेच्या आत प्रवेश करू शकत नाहीत. परिणामी, त्वचेच्या पृष्ठभागावर क्रीम लावल्याने त्यातील कोलेजन त्वचेच्या आत पोहोचेलच असे नाही. काही कंपन्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनातील घटक त्वचेच्या आत पोहोचवण्याच्या पद्धती विकसित केल्या आहेत. मात्र, सर्वच उत्पादनांमध्ये अशा तंत्रज्ञानाचा वापर केला जातो असे नाही.
त्यामुळे एखाद्या कोलेजन क्रीमचा उल्लेख ओटीसी (डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय उपलब्ध होणारे उत्पादन) म्हणून केला आहे, म्हणून ती प्रभावी ठरेलच असे नाही. अशा क्रीम्समुळे मिळणाऱ्या फायद्यांचा अर्थ त्वचेच्या आतील थरातील कोलेजनची प्रत्यक्ष भरपाई होते, असा घेऊ नये. कोलेजनच्या निर्मितीला चालना देण्यासाठी रेटिनॉइड्स आणि व्हिटॅमिन सी यांसारख्या घटकांना अधिक भक्कम वैज्ञानिक आधार आहे.
तोंडावाटे घेतल्या जाणाऱ्या कोलेजन सप्लिमेंट्सचे स्वरूप मात्र वेगळे आहे. अशा बहुतांश सप्लिमेंट्समध्ये हायड्रोलाइज्ड कोलेजन किंवा कोलेजन पेप्टाइड्स असतात. पचनप्रक्रियेदरम्यान त्यांचे विघटन होऊन ते लहान पेप्टाइड्समध्ये रूपांतरित होतात.हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की कोलेजन सप्लिमेंट्स या काही जादूच्या गोळ्या नाहीत. त्या वृद्धत्वाची प्रक्रिया थांबवू शकत नाहीत किंवा वृद्धत्वाचे परिणाम पूर्णपणे उलटवू शकत नाहीत. तसेच, त्या पेशींचे आयुष्य वाढवू शकत नाहीत.
कोलेजन हे केवळ मार्केटिंगसाठी वापरले जाणारे नाव नाही. ते पेप्टाइड्स आणि प्रथिनांशी संबंधित घटक आहेत, जे त्वचेसाठी उपयुक्त ठरू शकतात. ते त्वचेचा मऊपणा सुधारण्यास आणि त्वचेसाठी केल्या जाणाऱ्या उपचारांचे परिणाम अधिक चांगले होण्यास मदत करू शकतात.
त्यामुळे केवळ उत्पादनावर ‘कोलेजन’ हा शब्द लिहिला आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवण्याऐवजी त्या उत्पादनातील घटक, त्यांची कार्यपद्धती आणि त्यामागील वैज्ञानिक आधार समजून घेणे आवश्यक आहे. यासाठी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि योग्य त्वचेची निगा राखण्यावरही भर द्यावा.
Ans: कोलेजन हे शरीरात आढळणारे एक महत्त्वाचे प्रोटीन आहे. जे त्वचेला मजबुती, घट्टपणा आणि लवचिकता देते.
Ans: कोलेजन क्रीमचा काही प्रमाणात फायदा होऊ शकत. मात्र त्यांचे परिणाम व्यक्तीनुसार बदलतात.
Ans: नियमित सनस्क्रीन वापरा, संतुलित आहार घ्या, पुरेशी झोप घ्या आणि त्वचारोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य स्किनकेअर प्रोडक्टस वापरा.






