संग्रहित फोटो
ही महिला रुग्ण गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून तीव्र स्वरूपाच्या असामान्य मासिक पाळीतील रक्तस्रावाने त्रस्त होती. त्यामुळे तिला मासिक पाळीतील काळात दररोज जवळपास १२ सॅनिटरी पॅड्स बदलावे लागत होते. सोबतच तिला पोट फुगणे, चक्कर येणे, हृदयाची धडधड वाढणे आणि प्रचंड थकवा अशी लक्षणेही जाणवत होती. वैद्यकीय उपचारासाठी ती हॉस्पिटल मध्ये दाखल झाली, तेव्हा तिचे हिमोग्लोबिन केवळ ५ ग्रॅम प्रति डेसिलिटर इतके अत्यंत कमी झाले होते. त्यामुळे ती फारच निस्तेज आणि अशक्त दिसत होती.
तिची नाजूक प्रकृती आणि आधीपासून असलेल्या हृदयविषयक समस्यांचा विचार करता, तिला एका स्थानिक रुग्णालयातून आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. एबीएमएचमधील इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट व इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट विभागाचे असोसिएट डायरेक्टर डॉ. राजेश बदानी यांनी याबाबत समन्वय करत स्वतः रुग्णासोबत प्रवास केला आणि उपचाराच्या संपूर्ण कालावधीत बारकाईने लक्ष ठेवले.
आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमधील अत्यंत समन्वयाने काम करणाऱ्या बहूशाखीय तज्ज्ञांच्या संयुक्त पथकाने (मल्टिडिसिप्लिनरी टीम) हे प्रकरण हाताळले. या शस्त्रक्रियेचे नेतृत्व डॉ. निखिल पर्वते यांनी केले, तर डॉ. पंकज क्षीरसागर सह सर्जन म्हणून सहभागी झाले होते. भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. तानाजी म्हेत्रे यांनी जबाबदारी सांभाळली. महत्त्वाच्या मूत्रमार्ग संरचनांचे संरक्षण करण्यासाठी शस्त्रक्रियेपूर्वी युरेटरिक स्टेंटिंग (मूत्रपिंडातून मूत्राशयाकडे जाणाऱ्या मूत्रनलिकेत बारीक स्टेंट तात्पुरती बसवण्याची क्रिया) डॉ. राधेश्याम चौधरी यांनी केली. रुग्णाला हृदयविषयक धोका अधिक असल्याने, शस्त्रक्रियेच्या संपूर्ण वेळेत डॉ. बदानी उपस्थित राहून सतत हृदयाचे निरीक्षण आणि आवश्यक मदत पुरवत होते. कर्करोगाचा संशय दूर करण्यासाठी पॅथॉलॉजी टीमने सखोल तपासण्या केल्या. ही टीम डॉ. श्रुती राव आणि डॉ. किरण गोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती.
ट्यूमरचा आकार प्रचंड असूनही, शल्यचिकित्सकांनी ओपन सर्जरीद्वारे संपूर्ण १८ किलो वजनाचा ट्यूमर एकाच वेळी यशस्वीपणे काढून टाकला. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेदरम्यान रक्तस्राव १०० मिलीलीटरपेक्षाही कमी झाला आणि रुग्णाला शस्त्रक्रियेच्या दरम्यान किंवा नंतर रक्त चढवण्याची गरज भासली नाही.
याबाबत प्रतिक्रिया देताना, एबीएमएचचे स्त्रीरोगतज्ज्ञ कर्करोग व रोबोटिक सर्जन डॉ. निखिल पर्वते म्हणाले, “गर्भाशयाच्या ट्यूमरचा अतिशय मोठा आकार आणि रुग्णाची खालावलेली तब्येत यामुळे हे प्रकरण अत्यंत आव्हानात्मक होते. यासाठी काटेकोर शस्त्रक्रियेपूर्व नियोजन, रक्तासाठीचे व्यवस्थापन आणि अचूक शस्त्रक्रियेच्या माध्यमातून आम्ही आजूबाजूच्या अवयवांना इजा न करता संपूर्ण ट्यूमर सुरक्षितपणे काढू शकलो. यासाठी लवकर निदान आणि वेळेवर वैद्यकीच हस्तक्षेप अत्यंत महत्त्वाचा असतो.”
एबीएमएचचे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट व इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट डॉ. राजेश बदानी म्हणाले, “या रुग्णामध्ये कोणतीही स्पष्ट लक्षणे न दिसता तिच्या गर्भाशयाचा आकार अल्प काळात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला होता. मात्र, सतत हृदयविषयक निरीक्षण आणि समन्वयाने काम करणाऱ्या टीमच्या मदतीने आम्ही या अत्यंत उच्च जोखमीच्या शस्त्रक्रियेदरम्यान तिला सुरक्षितपणे ऊपचार देऊ शकलो.”शस्त्रक्रियेनंतर रुग्णावर बारकाईने निरीक्षण ठेवण्यात आले. काही दिवसांतच ती हालचाल करू शकत होती आणि शस्त्रक्रियेनंतर पाचव्या दिवशी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. विशेष म्हणजे, डिस्चार्जनंतर दोन आठवडे उलटूनही तिला कोणत्याही औषधांची आवश्यकता भासली नाही.
या यशस्वी उपचाराबाबत प्रतिक्रिया देताना, आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी पामेश गुप्ता म्हणाले, “ही शस्रक्रिया एबीएमएचमधील आमच्या बहूशाखीय तज्ज्ञांच्या मॉडेलची ताकद दाखवणारे उत्तम उदाहरण आहे. स्त्रीरोग, कर्करोग, कार्डिओलॉजी, भूलशास्त्र, युरोलॉजी, पॅथॉलॉजी आणि क्रिटिकल केअर या सर्व विभागांतील तज्ज्ञांनी एकत्रितपणे, प्रत्येक टप्प्यावर परस्पर समन्वय साधत काम केले. अशा गुंतागुंतीच्या आणि उच्च जोखमीच्या प्रकरणांमध्ये वेळेवर निर्णय आणि सामूहिक कौशल्य जीव वाचवणारे ठरते. तसेच, लवकर निदान आणि तातडीच्या हस्तक्षेपाचे महत्त्वही यातून अधोरेखित होते.”
ही शस्रक्रिया वेळेवर वैद्यकीच हस्तक्षेप, विविध तज्ज्ञांचे एकत्रित कौशल्य आणि सहृदयी उपचार यांच्या जोरावर अगदी गुंतागुंतीच्या व उच्च जोखमीच्या वैद्यकीय परिस्थितीतही उत्कृष्ट परिणाम साधता येतात, याचे ठोस उदाहरण ठरते.






