फोटो सौजन्य - Social Media
नवीन संशोधनानुसार आपली झोप फक्त आपल्या सवयींवर नाही, तर हवामान, आठवड्याचे दिवस आणि आपण राहत असलेल्या ठिकाणावरही अवलंबून असते. दक्षिण ऑस्ट्रेलियामधील फ्लिंडर्स विद्यापीठ येथील वैज्ञानिकांनी तीन वर्षांहून अधिक काळ एक विशेष उपकरणाच्या मदतीने 1 लाख 16 हजारांहून अधिक लोकांच्या 7 कोटींपेक्षा अधिक झोपेच्या रात्रींचा अभ्यास केला. त्यांनी प्रत्येक व्यक्तीच्या झोपेची वेळ, ती किती काळ टिकली, आणि कोणत्या कालावधीत झोप झाली याचे अचूक निरीक्षण केले.
या संशोधनातून एक महत्त्वाचा निष्कर्ष समोर आला की झोपेच्या वेळेत आणि तिच्या गुणवत्तेत हवामानाचा मोठा प्रभाव असतो. डॉ. हॅना स्कॉट, झोप संशोधक, सांगतात की, झोप फक्त मानसिक किंवा शारीरिक थकव्यातून होत नाही; ती आपल्या सभोवतालच्या वातावरणाशी जोडलेली असते. उष्णतेचा स्तर, प्रकाशाची तीव्रता, तसेच आठवड्याचा भाग हे सगळे घटक झोपेवर परिणाम करतात.
उदाहरणार्थ, युरोप आणि अमेरिकेतील लोक थंडीच्या दिवसात सरासरी १५ ते २० मिनिटे अधिक झोपतात, तर ऑस्ट्रेलियासारख्या दक्षिण गोलार्धातील देशांमध्ये उन्हाळ्यात झोपेची वेळ थोडीशी घटते. शिवाय, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शनिवार आणि रविवार बहुतांश लोक उशिरा झोपतात आणि झोप भरून काढण्याचा प्रयत्न करतात.
रिसर्चनुसार, झोपेचे हे बदलणारे पॅटर्न काही वेळा शरीराच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात. दरवर्षी सरासरी झोपेच्या वेळेत घट होत असल्याचे आढळले असून 2020 ते 2023 दरम्यान ही घट दरवर्षी सुमारे 2.5 मिनिटांनी झाली आहे. हे कोविड-19 नंतरच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे घडत असल्याचेही अभ्यासक मानतात. डॉ. डॅनी एकर्ट, या प्रकल्पाचे प्रमुख संशोधक, सांगतात की, “अनियमित झोप फक्त थकवा निर्माण करत नाही, तर ती हृदयविकार, मधुमेह आणि मानसिक तणावासारख्या गंभीर आजारांनाही कारणीभूत ठरू शकते.” या संशोधनातून हे स्पष्ट होते की झोप सुधारण्यासाठी केवळ वेळेचे नियोजन पुरेसे नाही, तर आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा, हवामानाचा आणि दैनंदिन जीवनशैलीचाही विचार करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे चांगली झोप हवी असेल, तर नैसर्गिक लयेनुसार जगणे आणि नियमितता राखणे फार महत्त्वाचे आहे.






