संग्रहित फोटो
पुणे : हृदयविकार हा भारतीय महिलांमधील मृत्यूचे प्रमुख कारण म्हणून समोर येत आहे. जवळजवळ १७ टक्के महिलांच्या मृत्यूला तो जबाबदार ठरत आहे; तरीसुद्धा भारतीय महिलांमध्ये याबाबतचा धोका ओळखण्याची जागरूकता मात्र अत्यंत कमी असून हे धक्कादायक आहे.
आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमधील हृदयरोग तज्ज्ञांच्या माहितीनुसार महिलांमधील संप्रेरकांमधील (हार्मोनल) बदल, चुकीच्या जीवनशैलीचा अवलंब आणि वेळेवर तपासण्याचा अभाव या कारणांमुळे भारतीय महिला अधिकाधिक हृदयविकारांना बळी पडताना दिसून येत आहेत.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS-5) नुसार, १५ ते ४९ वयोगटातील जवळपास पाच पैकी एक महिला निदान न झालेल्या उच्च रक्तदाबाने त्रस्त आहे. हा उच्च रक्तदाब हृदयविकाराचा धक्का आणि पक्षाघात यासारख्या मोठ्या जोखमीच्या घटकांना कारणीभूत ठरत आहे. पुरुषांच्या तुलनेत, महिलांना हृदयविकाराची अनेकदा वेगळी लक्षणे दिसतात. यामध्ये थकवा, मळमळ, धाप किंवा दम लागणे, जबड्यातील वेदना किंवा पाठदुखी ही आहेत. वरवर पाहता ही लक्षणे साधी आहेत. म्ह्णून या लक्षणांमुळे त्याचे निदान व उपचार उशिरा होतात.
आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. अन्नपूर्णा कालिया म्हणाले, “गर्भधारणा ही महिलांच्या हृदयाच्या आरोग्याबाबत आणखी गुंतागुंत निर्माण करते. गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यात रक्तदाब वाढल्यास त्यांना झटके येऊ शकतात किंवा ते जीवावर बेतून माता मृत्यूही होऊ शकते. जवळपास ३० टक्के महिला प्रसूतीनंतरही उच्च रक्तदाबाने त्रस्त असतात. ज्यामुळे त्यांना दीर्घकालीन हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. गर्भधारणेमुळे आलेला उच्च रक्तदाब हा फक्त तात्पुरता त्रास नसून तो अनेक वर्षे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करतो. म्हणूनच गर्भधारणा काळात आणि नंतरही योग्य तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”