फोटो सौजन्य - Social Media
मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा विषय! अडीअडचणीला कामी येणारी आणि भक्कम आधार देणारी गोष्ट म्हणजे मैत्री! पण कधीकधी आपल्या हातून घडणार्या चुका किंवा नकळत समोरच्या व्यक्तीच्या हातून घडणाऱ्या चुका या मैत्रीला तडे देतात आणि अखेर मैत्री तुटते. ‘Friendship Breakup’ अतिशय सामान्य गोष्ट वाटत असली तरी मनाला एक फार मोठी ठेच देणारी गोष्ट असते, कारण आपल्या आयुष्यातील एका व्यक्तीला गमावणे वाटते तितके सोपे नसते. जर तुम्ही या परिस्थितीत अडकले आहात तर काही गोष्टी आहेत त्या करून तुम्ही गोष्टी हाताळू शकता. चला तर मग जाणून घेऊयात, त्या गोष्टींबद्दल:
मैत्री तुटल्यावर आपल्यापासून दूर गेलेल्या मित्राची आठवण येणे काही थांबत नसेल तर एक काम करा. चुकी जर तुमच्याकडून झाली असेल तर माफी मागून घ्या आणि जर चुकी त्याच्याकडून झाली असेल तर त्याला एक संधी देऊन बघा. चुकी जर फार मोठी असेल आणि सांगूनही सतत त्या घडत असतील तर नक्कीच मैत्रीचा विचार करण्याची वेळ आली असते, हे लक्षात ठेवा. समोरच्याच्या प्रति मनात असलेला राग कमी करण्यासाठी त्याच्यामध्ये असलेले सकारात्मक गुण ओळखा. त्याने तुमच्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी आठवा. याने राग कमी होईल आणि कदाचित कालांतराने मैत्री पुन्हा सुरळीत.
जर समोरचा व्यक्तीच मैत्री तोडून गेला असेल तर त्याला एकदा समजवण्याचा प्रयत्न करा. आत्मसम्मानाला महत्व आहेच पण महत्व मैत्रीलाही आहे, त्यामुळे तुम्हीच समजूतदार बनून एक पाऊल पुढे टाका. पण समोरील व्यक्ती तरीही तुम्हाला मान देत नसेल तर आत्मसम्मान जपा. प्रयत्न करा पण लाचारी नको! खूप भावनिक जोडणी असेल तरीही स्वतःला सावरा.
आपले लक्ष इतर मित्रांकडे वळवा, जे तुमच्यावर जीव ओवाळून टाकतात. त्यांच्यासोबत वेळ घालवा, नवीन आठवणी तयार करा, जेणेकरून तुम्हाला त्या भावनिक जोडणीतून बाहेर येण्यास मदत मिळेल. सतत सकारत्मक राहा. घडलेल्या गोष्टींना पुन्हा पुन्हा मागे वळून पाहण्यापेक्षा भविष्यात आपल्यासोबत कोण योग्य आहे? याचा विचार कराल तर भावनाही योग्यजागी गुंतवाल आणि मानसिक त्रासही होणार नाही.