पांढऱ्या केसांना 'या' पद्धतीने द्या नॅचरल टचअप! मिनिटांमध्ये होतील काळेभोर सुंदर केस
महिलांसह पुरुषांना आपले केस कायमच चमकदार आणि सुंदर हवे असतात. यासाठी केसांची खूप जास्त काळजी घेतली जाते. कधी हेअर केअर रुटीनमध्ये बदल केला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर केमिकल ट्रीटमेंट केल्या जातात. पण वारंवार केसांवर केमिकल ट्रीटमेंट केल्यास केसांची नैसर्गिक चमक कमी होण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय जीवनशैलीतील बदलांमुळे तरुण वयातच मुलामुलींचे केस पांढरे होतात आणि केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. केस पांढरे होणे, केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस तुटणे इत्यादी समस्या वाढू लागल्यानंतर महिला खूप जास्त अस्वथ होतात. याचा परिणाम केसांच्या वाढीवर दिसून येतो. केस पांढरे झाल्यानंतर कोणतीही सुंदर हेअर स्टाईल केल्यानंतर सुद्धा केस विचित्रच दिसतात.(फोटो सौजन्य – istock)
Hair Care Tips: केस खूप गळतात? ‘या’ पोषक तत्वांच्या कमतरतेकडे दुर्लक्ष करू नका; ठरू शकते धोकादायक
केस पांढरे झाल्यानंतर ते पुन्हा एकदा काळे करण्यासाठी केसांवर मेहेंदी किंवा कोणताही हेअर कलर, डाय केला जातो. पण वारंवार हेअर डाय किंवा हेअर कलर केल्यास केस आणखीनच खराब होऊन जातात. बऱ्याचदा कोणत्याही कार्यक्रमाला जाण्याआधी महिला केसांवर मेहेंदी लावतात. मेहेंदी लावल्यामुळे केस काही काळापुरते अतिशय सुंदर दिसतात. पण काही दिवसांमध्येच केसांची गुणवत्ता खराब होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांना नॅचरल टचअप देण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. यामुळे कार्यक्रमात किंवा इतर सोहळ्यांमध्ये केस काळेभोर आणि सुंदर दिसतील.
पांढरे केस काळे करण्यासाठी कोणत्याही केमिकलचा वापर न करता नॅचरल टचअप द्यावा. यामुळे केसांना कोणतीही हानी पोहचणार नाही आणि केस सुंदर राहतील. यासाठी लोखंडी तवा, वाटीभर सुकवलेली कढीपत्त्याची पाने, कांद्याच्या साली, कलौंजी, हळद, आवळा पावडर आणि बदाम, अक्रोड इत्यादी साहित्य लागणार आहे.
सगळ्यात आधी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यात कढीपत्ता, कांद्याच्या साली, कलौंजी, हळद आणि आवळा पावडर घालून काळसर होईपर्यंत भाजा. गॅस मंद आचेवर ठेवावा. त्यानंतर चिमट्याने बदाम आणि अक्रोड गॅसवर भाजावे. भाजून घेतलेले सर्व साहित्य थंड झाल्यानंतर कॉटनच्या कपड्यात ओतून बारीक पावडर करून घ्या. तयार केलेली पावडर डब्यात भरून ठेवल्यास पुन्हा पुन्हा वापर करता येईल. तयार केलेली पावडर पांढऱ्या केसांवर लावल्यास केस काळेभोर दिसतील. याशिवाय कोरफड जेल आणि पावडर मिक्स करून सुद्धा केसांवर लावू शकता. यामुळे केसांची गुणवत्ता खराब होणार नाही आणि केस चमकदार दिसतील. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर केस, त्वचा आणि शरीरासाठी केला जातो. हे पदार्थ केसांना हानी पोहचवत नाही.






