फोटो सौजन्य - Social Media
मुंबई तशी ग्लॅमरने भरलेली नागरी… इकडच्या रात्रीमध्ये आणि दिवसामध्ये फरक फक्त इतकाच की दिवसा सूर्यप्रकाशाचा उजेड असतो आणि रात्री मानवी विद्युत रोषणाईचा… पण प्रकाश मात्र असतोच. गजबजही असते. पण मुंबईत अशादेखील काही जागा आहेत ज्या दिवसाही त्याच काळोखात विलीन असतात, ज्याचा आभास अमावस्येच्या अंधारासारखा असतो. हे ठिकाण प्रत्येक मुंबईकरांच्या नजरेआड झालेले आहे. हे ठिकाण दहिसर आणि बोरिवली दरम्यान लोकलने प्रवास करताना हमखास दिसून येते. या इमारतीला तसे काही प्रसिद्ध नाव नाही पण काही दशकांगोदर हिरानंदानी डेव्हलपर्स यांनी या वास्तूच्या बांधणीची सुरुवात केली होती.
या वास्तूच्या बांधणीदरम्यान असे काही प्रसंग घडले की वास्तूचे काम अर्धवट राहिलेच आणि या वास्तूकडे एक ‘हॉरर स्पॉट’ म्हणून प्रत्यके मुंबईकर पाहू लागला. इथल्या परिसराच्या आजूबाजूला राहणाऱ्या स्थानिकांमध्ये या इमारतीच्या संबंधित अनेक गोष्टी प्रसिद्ध आहे. त्यातील एक प्रसिद्ध गोष्ट आपण जाणून घेणार आहोत.
जवळजवळ २००५ ही गोष्ट आहे. समीर, विजय आणि उल्हास… हे तिघे सहकारी या इमारतीच्या बांधणीमध्ये कामाला होते. बांधणी तशी दिवसा आणि रात्री, अगदी दोन्ही वेळात २४ तासांसाठी जोरात सुरु होती. पण दिवसा येथे काम करणाऱ्यांची संख्या अफाट होती. रात्री त्यामानाने कमी होती. या तिन्ही सहकाऱ्यांची ड्युटी रात्रीच्या वेळी होती. समीर आणि विजय, ६व्या मजल्यावर काम करत होते. उल्हास देखरेखी करता ९व्या माळ्यावर गेला होता. समीर आणि विजय त्यांच्या कामात व्यस्त होते. तितक्यात, त्यांना वरून खाली कुणीतरी पडण्याचा भास तसा आवाजही आला. दोघे कामे तसेच टाकून, वरती ९व्या मजल्यावर पळाले. त्यांनी तिथे उल्हास ठीक आहे की नाही? याची शाहनिशा केली. उल्हास अगदी ठीक होता आणि त्याला कसलाही आवाजही जाणवला नव्हता. कामे आटपून हे तिघे त्यांच्या घरी परतण्यासाठी निघाले.
दुसऱ्या दिवसाची रात्री उजाडली. आजही या तिघांची नाईट शिफ्ट होती. समीर आणि विजय तसे नुकतेच कामाला लागले असल्यामुळे उल्हास याचा त्यांना फार आधार होत आणि ते त्याच्या हाताखालीच काम करत. पण त्या दिवशी कामगार राहुलही त्यांच्यासह रात्रीच्या वेळी काम करण्यासाठी उपस्थित होता. रात्री कामे आटपून चौघे जण गप्पा मारण्यासाठी एकत्र जमले तेव्हा राहुल, समीर आणि विजयकडे एका वेगळ्याच नजरेने पाहत होता. त्या दोघांनी ते पाहून पाहून घेतले आणि एकदाची विचारणाच केली.
समीर म्हणाला, “राहुल… काय रे? वेड लागलंय का? असा का… आमच्याकडे बघत आहेस?” तेव्हा विजय म्हणतो, “हो रे… मी पण मगासपासून पाहतोय. राहुल, आपल्या दोघांवर फार विचित्र प्रकारे लक्ष देण्याचा प्रयत्न करतोय. काय रे राहुल? काय झालं? वेडा झालास का?” तेव्हा राहुल त्या दोघांना म्हणतो…”वेड मला नाही. वेड तुम्हा दोघांना लागलं आहे. कधीपासून बघतोय मी… तुम्ही दोघे त्या भिंतीशी काय बोलत आहात? काय आहे त्या भितींकडे?” तेव्हा त्या दोघांना प्रश्न पडतो. तेव्हा विजय त्याला म्हणतो “अरे वेड्या, आम्हाला वेड्यात काढतो का? आंधळ्या, उल्हासशी बोलतोय आम्ही. काय रे उल्हास? खरंच, वेडा झालाय राहुल?” तेव्हा उल्हास त्यांच्याकडे स्तब्ध पाहत हसत असतो पण एक शब्दही तोंडातून काढत नाही.
राहुल जोरात ‘काय?’ म्हणून बोलतो. त्यांच्या तोंडावर बारा वाजलेले असतात. तो त्यांना म्हणतो,”अरे पण हे कसं शक्य आहे? उल्हास गेला. सकाळीच त्याचे मृतशरीर खाली सिमेंटमध्ये भेटलेलं. अरे… मज्जा घेण्याची पण एक मर्यादा असते.” असे म्हणत तो तिथून निघून जातो. विजय आणि समीर एकमेकांकडे पाहतात. दोघे वळून उल्हासकडे पाहतात. उल्हास तसाच स्तब्ध उभा असतो. उल्हासच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं. उल्हास त्यांना म्हणतो,” होय. पण मला इथे एकटं नाही राहवत आहे. मी तुम्हालाही इथेच माझ्यासोबत ठेवणार आहे.”
असे म्हणतात की त्या वास्तूवर आजही रडण्याचे आवाज जाणवतात. २० वर्ष झाली, ती वास्तू तशीच अर्धवट आहे. कुणी तिथे फिरकण्याची धाडसही करत नाही.