फोटो सौजन्य - Social Media
कोणीतरी दिसतं, मनात हलकासा स्पर्श होतो, आणि नकळत हृदयाचा ठोका चुकतो. त्याच्याशी बोलावं, मनातलं सगळं सांगावं असं वाटायला लागतं. अशा वेळी मनातील भावना योग्य शब्दांत, योग्य वेळेला आणि योग्य पद्धतीने व्यक्त करणं फार महत्त्वाचं असतं. यासाठी सर्वात आधी गरज असते ती संवादाची. तुम्ही त्या व्यक्तीला वारंवार बघत असाल, भेटू इच्छित असाल, तर आधी संवाद सुरू करणं आवश्यक आहे. कोणत्याही नात्याची सुरुवात ही संवादातूनच होते. साध्या शुभेच्छांपासून सुरुवात करून हळूहळू ओळख वाढवता येते.
संवाद करताना समोरच्याचा सन्मान राखणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या प्रत्येक शब्दाला लक्ष देऊन ऐका. कुठलाही विनोद किंवा टिप्पणी त्यांच्या भावना दुखावणारी नसावी. एकमेकांना समजून घेण्यासाठी संवादात मोकळेपण असावा. हलकंफुलकं हसू-मस्करी केल्याने जडपणा कमी होतो आणि दोघंही सहज जोडले जातात.
अनेक वेळा आपण ‘तो आधी बोलेल, मग मी’ या विचारात राहतो. पण त्यामुळे संधी निसटते. जर खरंच कुणीतरी मनात घर करून बसलं असेल, तर आपल्या भावना व्यक्त करणं गरजेचं असतं. समोरच्याच्या स्वभावाचा अंदाज घेत, योग्य वेळी, शांतपणे आणि सच्चेपणाने सांगितलेलं मनातलं, जास्त पोहोचतं. त्यासाठी आधी नातं संवादाच्या पलीकडे जाऊन विश्वासाचं व्हायला हवं.
कधी कधी आपण इम्प्रेस करण्याच्या नादात आपली ओळखच बदलतो. पण हे फार काळ टिकत नाही. जसं तुम्ही आहात, तसंच समोरच्याला दिसू द्या. त्यानेच विश्वास आणि मैत्रीचं नातं बळकट होतं. तसेच, समोरच्याच्या आवडीनिवडी समजून घेणं गरजेचं आहे. काही वेळा आपण भेटण्यासाठी निवडलेली जागा, समोरच्याच्या स्वभावाला न पटणारी ठरते. म्हणूनच एकमेकांबद्दल जाणून घेणं आणि त्याला जाणीवपूर्वक समजून घेणं महत्त्वाचं. शेवटी इतकंच सांगावंसं वाटतं की, भावना व्यक्त करायच्या असतील, तर त्या सच्च्या असाव्यात. आदर, संयम आणि स्वच्छ हेतूने व्यक्त केलेल्या भावना हृदयात नक्की पोहोचतात. आणि त्यातूनच खरं नातं आकार घेतं.






