
मुलांच्या हाडांच्या फ्रॅक्चरची काळजी कशी घ्यावी (फोटो सौजन्य - iStock)
प्रौढांच्या तुलनेत मुलांची हाडे अजून वाढीच्या अवस्थेत असतात. त्यांच्या हाडांमध्ये ‘ग्रोथ प्लेट’ (हाडांच्या वाढीसाठी महत्त्वाचा भाग) असल्याने ती अधिक लवचिक असतात. त्यामुळे हाडे सहज तुटत नसली, तरी मुलांमध्ये विशिष्ट प्रकारची फ्रॅक्चर आढळतात. यामध्ये ‘ग्रीनस्टिक फ्रॅक्चर’, ‘बकल (टोरस) फ्रॅक्चर’ आणि ग्रोथ प्लेटला झालेल्या दुखापतींचा समावेश होतो. विशेषतः ग्रोथ प्लेटला झालेल्या दुखापतींचे वेळेवर निदान आणि योग्य उपचार न झाल्यास भविष्यात हाडांच्या वाढीवर आणि त्यांच्या आकारावर परिणाम होऊ शकतो. डॉ. सुशांत श्रीवास्तव, बाल अस्थिरोगतज्ज्ञ, अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन, औंध, पुणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
फ्रॅक्चर नक्की का होते?
पावसाळ्यातील बहुतांश फ्रॅक्चर ही किरकोळ पडल्यामुळे होतात. शाळेतील ओल्या कॉरिडॉरमध्ये धावताना घसरणे, पावसाने ओल्या झालेल्या मैदानावर घसरुन पडणे, निसरड्या रस्त्यावर सायकल चालवताना तोल जाणे किंवा जिन्यावरून पडणे ही त्यामागील सामान्य कारणे आहेत. अशा दुखापतींमध्ये मनगट, हाताचा पुढील भाग (Forearm), कोपर, घोटा, पाय आणि कॉलर बोन (हंसलीचे हाड) या भागांना सर्वाधिक इजा होण्याची शक्यता असते.
फ्रॅक्चर झालंय? मग आहाराकडे लक्ष द्या! हाडं लवकर जोडण्यासाठी ‘हे’ घरगुती पदार्थ ठरतील रामबाण
लक्षणे काय आहेत?
मुलांमधीस फ्रॅक्चरची लक्षणे पालकांनी त्वरित ओळखणे गरजेचे आहे. दुखापतीच्या ठिकाणी तीव्र वेदना होणे, सूज येणे, स्पर्श केल्यावर दुखणे, तो भाग निळसर पडणे, हात किंवा पायाचा वापर करण्यास टाळणे, चालताना त्रास होणे, हाडाचा आकार बदलल्यासारखे दिसणे किंवा लहान मुले दुखापत झालेल्या भागाला हात लावताच रडू लागतात. ही फ्रॅक्चरची महत्त्वाची लक्षणं असून काही वेळा बकल किंवा न हललेल्या (नॉन-डिस्प्लेस्ड) फ्रॅक्चरमध्ये बाहेरून कोणतीही विकृती दिसत नाही, मात्र तीव्र वेदना आणि हालचालींमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.
प्रथमोपचार अधिक गरजेचा
फ्रॅक्चरचा संशय आल्यास योग्यवेळीच प्रथमोपचार करणे अत्यंत गरजेचे आहे. दुखापत झालेला हात किंवा पाय शक्य तितका स्थिर ठेवावा आणि त्याची अनावश्यक हालचाल टाळावी. सूज आणि वेदना कमी करण्यासाठी कापडात गुंडाळलेला बर्फाचा शेक १५ ते २० मिनिटे देता येतो. मात्र, वाकलेले हाड सरळ करण्याचा प्रयत्न करू नये किंवा दुखापत झालेल्या भागाला मालिश करू नये. अशा वेळी तातडीने बाल अस्थिरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा किंवा जवळच्या आपत्कालीन विभागात मुलाला दाखल करावे. बहुतांश वेळा शारीरिक तपासणी आणि एक्स-रेच्या मदतीने फ्रॅक्चरचे निदान करता येते. काही गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये अतिरिक्त तपासण्यांची आवश्यकता भासू शकते.
फ्रॅक्चरचा प्रकार, मुलाचे वय, दुखापतीचे ठिकाण आणि ग्रोथ प्लेटचा सहभाग यानुसार उपचार निश्चित केले जातात. लहान मुलांमध्ये हाडं लवकर भरून येण्याची क्षमता अधिक असल्याने अनेक फ्रॅक्चरवर प्लास्टर किंवा स्प्लिंट लावून यशस्वी उपचार करता येतात. मात्र, हाडांचे विस्थापन झाले असल्यास, सांध्याजवळील किंवा ग्रोथ प्लेटशी संबंधित गंभीर फ्रॅक्चर असल्यास शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. उपचारानंतर नियमित तपासणी करून हाड योग्य पद्धतीने जुळत आहे का, तसेच भविष्यात वाढीशी संबंधित कोणतीही समस्या निर्माण होत नाही ना, याची खात्री करणे आवश्यक असते.
पालकांनी काय काळजी घ्यायची
पावसाळ्यात अशा दुखापती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे आहेत. घरातील पायऱ्या, फरशी कोरडी ठेवावी, बाथरूममध्ये अँटी-स्लिप मॅटचा वापर करावा, जिन्यांमध्ये पुरेशी प्रकाशव्यवस्था असावी आणि मुलांना पावसाळ्यासाठी विशेष पादत्राणे घालणे . शाळा आणि निवासी संकुलांनीही कॉरिडॉर, खेळाची मैदाने आणि जिने कोरडे व सुरक्षित ठेवण्याची काळजी घ्यावी. मुसळधार पावसात मुलांच्या मैदानी खेळांवर लक्ष ठेवावे आणि निसरड्या ठिकाणी धावणे किंवा असुरक्षित हवामानात सायकल चालवणे टाळण्याचा सल्ला द्यावा.
फेस ट्रॉमा म्हणजे काय? जाणून घ्या चेहऱ्यावरील आघाताबाबत
कोणता आहार घ्यावा
मुलांच्या हाडांच्या आरोग्यासाठी संतुलित आहार, पुरेसे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी, वयानुसार नियमित शारीरिक हालचाली आणि योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश यांचाही मोठा फायदा होतो. यामुळे हाडे मजबूत राहण्यास मदत होते आणि दुखापत झाल्यास ती लवकर बरी होण्यास हातभार लागतो.
बहुतांश मुलांमध्ये फ्रॅक्चरचे योग्य वेळी निदान आणि उपचार झाल्यास ते पूर्णपणे बरे होतात. त्यामुळे पावसाळ्यात मुलांच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहणे, दुखापतीची लक्षणे ओळखणे आणि आवश्यक ती तातडीची वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे. पालक, शाळा आणि कुटुंबियांनी यांनी मिळून योग्य काळजी घेतल्यास मुले पावसाळ्याचा आनंद सुरक्षितपणे घेऊ शकतात आणि त्यांच्या हाडांचे आरोग्यही जपू शकतात.