फोटो सौजन्य - Social Media
कोणतंही नातं परस्पर समजूत, विश्वास आणि संमतीवर आधारलेलं असतं. मात्र, जर तुमचा जोडीदार वारंवार फिजिकल होण्यासाठी दबाव टाकत असेल आणि तुमच्या भावना किंवा कम्फर्टचा विचार करत नसेल, तर हे एक “रेड फ्लॅग” आहे. म्हणजेच नात्याला जखमा देणारा स्पष्ट इशारा आहे. मुळात, अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणं आपल्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. फिजिकल रिलेशनशिपमध्ये दोघांचीही स्पष्ट आणि मनापासून संमती असावी लागते. एकतर्फी दबावामुळे नातं असमतोल होऊ शकतं. काही वेळा काही जोडीदार असेही म्हणतात की, “जर तू माझ्यावर खरंच प्रेम करत असशील तर…”, किंवा “सगळी कपल्स असंच करतात”, अशा प्रकारची बोलणी ही इमोशनल ब्लॅकमेलिंगची उदाहरणं आहेत. त्यातून तुमच्यावर भावनिक दबाव टाकण्याचा प्रयत्न होतो. हे कोणत्याही आरोग्यदायी नात्याचं लक्षण नाही.
अनेकदा अशा वागणुकीमुळे व्यक्तीला अपराधी वाटायला लागतं. त्यांना असं वाटतं की, मी त्यांच्या गरजा पूर्ण करत नाही, किंवा मी त्यांना दुखावतो आहे. ही एक प्रकारची मानसिक छळवणूक देखील असू शकते. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या आतल्या भावना समजून घेणं आणि त्यांचा आदर करणं गरजेचं आहे. जर नात्यात पुढील गोष्टी वारंवार घडत असतील: तुमच्या नकारानंतरही दबाव टाकणं, तुमच्या भावना दुर्लक्षित करणं, नकार दिल्यावर रागावणं किंवा अंतर ठेवणं, फिजिकल होणं म्हणजेच प्रेम मानणं, तुमच्या संमतीशिवाय स्पर्श करणं किंवा मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करणं. तर हे नातं योग्य दिशेने जात नाही, याची जाणीव असणं गरजेचं आहे.
अशा परिस्थितीत स्वतःच्या भावना आणि मर्यादा यांना प्राधान्य द्या. तुम्ही तयार नसाल, तर ‘नाही’ म्हणणं पूर्णपणे योग्य आहे. तुमचं मत मोकळेपणाने, स्पष्टपणे जोडीदारासमोर मांडा आणि त्याच्या प्रतिक्रियेवर विचार करा. जर कोणी तुमच्या मर्यादा वारंवार ओलांडत असेल, तर त्या नात्याचा पुन्हा विचार करणंही गरजेचं आहे. आणि जर तुम्ही गोंधळलेले किंवा मानसिक तणावात असाल, तर एखाद्या विश्वासू मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा काउन्सलरशी नक्की चर्चा करा.
स्वतःच्या मन:शांतीसाठी आणि आत्मसन्मानासाठी योग्य निर्णय घेणं हे नेहमीच महत्त्वाचं असतं. त्यामुळे अशा वागणुकीपासून स्वतःला सुरक्षित ठेवणं, हे तुमचं हक्काचं आणि जबाबदारीचं काम आहे.