Roti Cutlet Recipe: जर तुम्हालाही उरलेल्या पोळ्या फेकायच्या नसतील तर ही रोटी कटलेट रेसिपी नक्की ट्राय करा.
Roti Cutlet Recipe
Follow Us:
Follow Us:
विस्तार
नाश्त्यासाठी आहे एकदम भन्नाट पर्याय
उरलेल्या पोळ्यांचे बनवा चविष्ट रोटी कटलेट
नोट करून घ्या रेसिपी
रोजच्या जेवणात पोळ्या बनवल्यानंतर काही पोळ्या उरतातच. ही जवळपास प्रत्येक घरातली गोष्ट आहे. दुसऱ्या दिवशी त्या पोळ्या खाण्याचा कंटाळा येतो आणि अनेकदा त्या फेकून देण्याची वेळही येते. मात्र, या उरलेल्या पोळ्यांचा उपयोग करून तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी चविष्ट आणि कुरकुरीत रोटी कटलेट बनवू शकता. विशेष म्हणजे यासाठी वेगळ्या किंवा महागड्या साहित्याची गरज नाही. घरात उपलब्ध असलेल्या भाज्या, मसाले आणि इतर पदार्थांचा वापर करून हे कटलेट सहज बनवता येतात.ही रेसिपी बनवायला सोपी असून घरातील उपलब्ध भाज्यांचा वापर करूनही ती तयार करता येते. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही रोटी कटलेट रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.
सर्वप्रथम उरलेल्या पोळ्यांचे छोटे तुकडे करून घ्या. हे तुकडे मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्या. आता एका मोठ्या भांड्यात हे पोळीचे मिश्रण काढा. त्यामध्ये उकडलेले बटाटे चांगले मॅश करून घाला.यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, गाजर किंवा उपलब्ध भाज्या, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला. लाल तिखट, जिरेपूड, चाट मसाला आणि मीठ घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा.मिश्रण पातळ वाटत असल्यास त्यात थोडे ब्रेड क्रम्ब्स किंवा रवा घालू शकता. आता हाताला थोडे तेल लावून मिश्रणाचे छोटे गोळे तयार करा आणि हलक्या हाताने कटलेटचा आकार द्या. यानंतर, तवा गरम करून त्यावर थोडे तेल सोडा. तयार केलेली कटलेट्स तव्यावर ठेवून दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करा. तयार रोटी कटलेट्स गरमागरम चटणी, टोमॅटो सॉस किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.
छोट्या टिप्स
कटलेट अधिक कुरकुरीत हवे असल्यास बाहेरून रवा किंवा ब्रेड क्रम्ब्सचा हलका थर लावा. तसेच भाज्यांमध्ये तुमच्या आवडीप्रमाणे मटार, बीट किंवा कोबीचा समावेश करू शकता.