केरळनंतर महाराष्ट्राचा माता मृत्यू दर सर्वात कमी ३६; एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान ४४ माता मृत्यूची नोंद
या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ या सात महिन्यांत ४४ मातामृत्यू नोंदले गेले आहेत. ही संख्या मागील वर्षीच्या तुलनेत कमी असली तरी काही भागांतील वाढ चिंताजनक आहे. यापैकी पुन्हा सर्वाधिक २७ मृत्यू पुणे महापालिका क्षेत्रात झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत १२, बारामतीत २, आंबेगावमध्ये २ आणि दौंडमध्ये १ मातामृत्यूची नोंद झाली आहे. या वर्षी इतर कोणत्याही तालुक्यात एकही मातामृत्यू झाला नाही.
मातामृत्यूची प्रमुख कारणे
गर्भधारणेदरम्यान किंवा प्रसूतीनंतर ४२ दिवसांच्या आत उद्भवणाऱ्या गुंतागुंतींमुळे होणाऱ्या मृत्यूला मातामृत्यू म्हणतात. यात अपघात किंवा इतर आकस्मिक मृत्यूंचा समावेश होत नाही.
महाराष्ट्र सरकारकडून मातामृत्यू रोखण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जातात. यामध्ये जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, मातृत्व अनुदान, मानव विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, अॅनिमिया मुक्त भारत, सुरक्षित मातृत्व आश्वासन (SUMAN) आणि वात्सल्य कार्यक्रमांचा समावेश आहे. या योजनांतर्गत गर्भवती व प्रसूत माताना मोफत उपचार, लंब तपासण्या, आर्थिक मदत, मोफत रुग्णवाहिका, औषधे आणि संस्थात्मक प्रसूतीसाठी प्रोत्साहन दिले जाते.
सध्या राज्यातील मातामृत्यू दर प्रति एक लाख जिवंत जन्मांमागे ३६ आहे आणि ती आणखी कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, त्यासाठी दर महिन्याला जिल्हा, महापालिका आणि प्रादेशिक स्तरावर बैठकांचे आयोजन कैले जाते, राज्यस्तरीय पुनरावलोकनही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले जाते. प्रत्येक मातामृत्यूची सखोल चौकशी करून लाईन लिस्ट, अन्वेषण अहवाल तयार केला जातो आणि MCDSR सॉफ्टवेअरमध्ये नौद केली जाते. प्रत्येक प्रकरणाची तपासणी समितीकडून चौकशी करून अहवाल शासनाकडे पाठवला जातो. ज्यानुसार राज्य कृती दल समिती पुढील धोरण आखते.






