स्त्रियांप्रमाणे पुरुषांनाही रजोनिवृत्ती होते का? तुम्ही कदाचित पुरुष रजोनिवृत्तीबद्दल ऐकले असेल, परंतु हे वास्तव आहे की ते एक मिथक आहे? याबद्दल जाणून घेण्यासाठी आम्ही काही डॉक्टरांशी बोललो आणि त्यांनी महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. पुरुष रजोनिवृत्ती म्हणजे काय आणि त्याच्याशी संबंधित सर्व गोष्टी जाणून घेऊया.
स्त्रियांमध्ये होत असलेल्या रजोनिवृत्तीबद्दल तुम्हाला माहिती असेल की, साधारण 45-55 व्या वर्षी महिालांना रजोनिवृत्तीचा अनुभव येतो, म्हणजेच मासिक पाळी येणे थांबते. हे इस्ट्रोजेन हार्मोनच्या कमतरतेमुळे होते. त्याचप्रमाणे, वाढत्या वयाबरोबर पुरुषांमध्येही काही हार्मोनल बदल होतात. पण पुरूषांमध्येही रजोनिवृत्ती असते का आणि त्यांच्यातही स्त्रियांप्रमाणे हार्मोन्समध्ये अचानक घट होते का? याबाबत जाणून तज्ज्ञांनी काही महत्त्वाची माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)
मेल मेनोपॉज म्हणजे काय?
डॉ. मनीषा अरोरा, स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र विभागाच्या संचालक आणि युनिट प्रमुख, मॅक्स हॉस्पिटल, गुरुग्राम यांनी सांगितले की पुरुषांमध्ये देखील रजोनिवृत्तीसारखे बदल होतात, ज्याला एंड्रोपॉज किंवा पुरुष रजोनिवृत्ती म्हणतात. टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झाल्यामुळे हे घडते.
मात्र पुरूषांमध्ये महिलांप्रमाणे हे अचानक सुरू होत नाही तर त्याची प्रक्रिया ही हळूहळू होते. पुरुषांमध्ये, वयाच्या 30 नंतर, टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी हळूहळू कमी होऊ लागते. दरवर्षी ते सरासरी 1 टक्क्यांनी कमी होतात. तथापि, वाढत्या वयानुसार, कधीकधी टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी इतर कारणांमुळे देखील कमी होऊ शकते.
मेल मेनोपॉजची लक्षणे
याबाबत अधिक माहिती देताना डॉ.अरोरा यांनी सांगितले की, 45 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील पुरुषांमध्ये एंड्रोपॉज किंवा पुरुषी रजोनिवृत्ती अधिक प्रमाणात दिसून येते. टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स कमी झाल्यामुळे, थकवा, नैराश्य, चिडचिड, लैंगिक इच्छा कमी होणे, इरेक्टाइल डिस्फंक्शन आणि स्नायूंच्या वस्तुमानात घट यांसारखी लक्षणे (Male Menopause Symptoms) दिसतात. वाढत्या वयाबरोबर हार्मोन्स कमी झाल्यामुळे असे घडते, परंतु तणाव, खराब जीवनशैली किंवा आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या अशी इतर कारणेदेखील त्यामागे असू शकतात.
[read_also content=” नसांमध्ये साचलंय LDL कोलेस्ट्रोल? बाबा रामदेवांचा घरगुती उपाय, या भाजीचा ज्युस ठरेल वरदान https://www.navarashtra.com/lifestyle/baba-ramdev-cholesterol-home-remedy-gourd-juice-will-reduce-ldl-cholesterol-with-immediate-effect-547957/”]
कसा करावा मेल मेनोपॉज मॅनेज
पुरुषांमधील रजोनिवृत्तीदेखील तुम्ही समजून घेऊन योग्यरित्या हाताळू शकता. त्याचे व्यवस्थापन करण्याच्या उपायांबद्दल बोलताना डॉ. आरिफ अख्तर, वरीष्ठ सल्लागार, युरोलॉजी विभाग, मारिंगो एशिया हॉस्पिटल, गुरुग्राम यांनी सांगितले की, जीवनशैली आणि आरोग्य व्यावसायिकांची अर्थात वैद्यकीय मदत घेणे हे एंड्रोपॉज मेनोपॉज व्यवस्थापन करण्यासाठी प्रभावी ठरू शकते.
जीवनशैलीत बदल करा
फळे, भाज्या, पातळ प्रथिने आणि धान्य यांचा समावेश असलेला संतुलित आहार घेतल्याने थकवा टाळता येतो आणि पुरूषांच्या आरोग्याला चालना मिळते. संतुलित आहार घेतल्याने हार्मोनल चढउतारांमुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्या कमी होण्यास मदत होईल. तसेच, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी व्यायामासह नियमित व्यायाम करा. हे स्नायूंचे नुकसान टाळेल आणि त्याचवेळी मूडदेखील सुधारेल.
[read_also content=”जागतिक रक्तदाता दिन का साजरा केला जातो? काय आहे या वर्षाची थीम https://www.navarashtra.com/lifestyle/world-blood-donor-day-importance-history-and-significance-know-the-2024-theme-547848/”]
तणाव कमी करा
ध्यान, योगाच्या मदतीने तणाव कमी करण्यात खूप मदत होते आणि मानसिक आरोग्यदेखील सुधारते. याव्यतिरिक्त, चांगली झोप घेतल्याने तणाव कमी होण्यास मदत होते. त्यामुळे 7-8 तासांची झोप घ्या. या काळात झोप ही अत्यंत आवश्यक आहे.
हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी
टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी फायदेशीर ठरू शकते. त्यापूर्वी, तुमच्या डॉक्टरांना भेटा आणि त्याच्याशी संबंधित जोखीम आणि फायद्यांबद्दल संपूर्ण माहिती मिळवा आणि त्यानंतरच निर्णय घ्या. तसेच, तुमच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी आणि आरोग्याची नियमित तपासणी करा.
मेंटल हेल्थसाठी मदत घ्या
समुपदेशन किंवा थेरपीची मदत घेणे मूड स्विंग्स आणि एंड्रोपॉजमुळे होणारे नैराश्य यासाठी फायदेशीर ठरू शकते. स्वतःला एकटं राहू देऊ नका. एकटेपणा जाणवत असेल तर वेळीच मदत घ्या. आपल्या घरच्यांशी बोला, मित्रमैत्रिणींसमोर व्यक्त व्हा. काहीच जमत नसेल तर डॉक्टरांची मदत घ्या.