(फोटो सौजन्य-AI एआय)
शब्दाचा मूळ अर्थ
‘मुजाहिदीन’ हा अरबी भाषेतील ‘मुजाहिद’ या शब्दाचा अनेकवचनी प्रकार आहे. ‘मुजाहिद’ म्हणजे संघर्ष किंवा प्रयत्न करणारी व्यक्ती, तर ‘मुजाहिदीन’ म्हणजे अशा व्यक्तींचा समूह. हा शब्द अरबीतील ‘जिहाद’ या संकल्पनेशी संबंधित आहे. इथे ‘जिहाद’चा व्यापक अर्थ संघर्ष, प्रयत्न किंवा एखाद्या उद्दिष्टासाठी झगडणे असा होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी ‘मुजाहिदीन’ म्हणजे दहशतवादी असा अर्थ लावणे योग्य ठरेलच असे नाही.
आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख
या शब्दाला आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष ओळख अफगाणिस्तानातील सोव्हिएतविरोधी संघर्षामुळे मिळाली. 1979 मध्ये सोव्हिएत सैन्याने अफगाणिस्तानात प्रवेश केल्यानंतर विविध सशस्त्र गटांनी त्यांच्याविरोधात लढा दिला. या गटांना मोठ्या प्रमाणावर ‘अफगाण मुजाहिदीन’ म्हणून संबोधले गेले. मात्र हे सर्व गट एकसारखे नव्हते; त्यांच्यात विचारसरणी, नेतृत्व आणि राजकीय उद्दिष्टांमध्ये फरक होता.
उग्रवादी कट्टरपंथीय संघटनांचा संबंध
नंतरच्या काळात काही कट्टरपंथी आणि जिहादी संघटनांनी ‘मुजाहिदीन’ हा शब्द आपल्या नावांमध्ये किंवा ओळखीत वापरला. भारतात ‘इंडियन मुजाहिदीन’सारख्या दहशतवादी संघटनेचा उल्लेख सुरक्षा आणि दहशतवादाशी संबंधित बातम्यांमध्ये झालेला दिसून आहे. भारताच्या गृह मंत्रालयाच्या दहशतवादी संघटनांच्या यादीत ‘जमात-उल-मुजाहिदीन’शी संबंधित संघटनांचाही उल्लेखही आहे. त्यामुळे आधुनिक बातम्यांमध्ये हा शब्द अनेकदा हिंसक कट्टरतावादाच्या संदर्भात वापरताना दिसतो.
मल्टीमिडिया वरून शब्दाची प्रसिद्धी
आज चित्रपट, वेब सीरिज आणि लोकप्रिय कथानकांमध्ये ‘मुजाहिदीन’ हा शब्द अनेकदा सशस्त्र किंवा दहशतवादी गटासाठी वापरला जातो. त्यामुळे मनोरंजन माध्यमांमधून तयार होणारी प्रतिमा आणि शब्दाचा मूळ भाषिक अर्थ यामध्ये फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. तथापि, याचा प्रचलित अर्थ आणि संबंधित पंथांची विचारसरणीही नाकारता येत नाही.






