फोटो सौजन्य - Social Media
आपलं शरीर जेव्हा कुठल्याही समस्येतून जातं, तेव्हा ते आपल्याला विविध प्रकारे इशारे देतं. विशेषत: रात्रीच्या वेळी दिसणारे काही संकेत लोक सहज दुर्लक्षित करतात, मात्र हे लक्षणं हृदय, मूत्रपिंड आणि यकृताशी संबंधित गंभीर आजाराचे द्योतक असू शकतात. जर रात्री वारंवार लघवीसाठी उठावं लागत असेल (नॉक्टुरिया), झोपल्यावर श्वास घेण्यात अडचण होत असेल, छातीत दडपण, वेदना किंवा विनाकारण घाम येत असेल, तर हे साधं न समजता तात्काळ गंभीरतेनं घ्यायला हवं.
वारंवार लघवी लागणं हे केवळ त्रासदायक नाही तर किडनीच्या आजाराची किंवा हार्ट फेल्युअरची सुरुवात असू शकते. यासोबत पाय सुजणे, थकवा किंवा श्वास घेण्यात त्रास होणं ही लक्षणं दिसली, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे झोपल्यावर अचानक श्वास घेता न येणं किंवा श्वास फुलणं हे हृदयाचं रक्त व्यवस्थित पंप न करणं आणि फुफ्फुसात पाणी साचण्याचं लक्षण असू शकतं. छातीत वेदना, दडपण किंवा रात्री अचानक घाम येणं हे देखील हृदयविकाराचा इशारा असतो.
झोप नीट न लागणं, वारंवार झोप मोडणं किंवा रात्री झोपेत अस्वस्थता जाणवणं हे यकृताच्या कार्याशी संबंधित समस्या दर्शवू शकतं. विशेषत: रात्री पाय सतत हलवावसं वाटणं किंवा बेचैनी जाणवणं, हे लिव्हरच्या कार्यात बिघाड असल्याचं लक्षण आहे.
जर हे लक्षणं रात्री सातत्याने जाणवत असतील, तर ते दुर्लक्षित करणं धोकादायक ठरू शकतं. अशा वेळी विलंब न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. वेळेत निदान आणि योग्य उपचार केल्यास हृदय, मूत्रपिंड आणि यकृताशी संबंधित अनेक गंभीर आजारांवर नियंत्रण मिळवता येतं. त्यामुळे शरीराचे हे सूक्ष्म संकेत कधीही दुर्लक्षित करू नका. जागरूक राहा, वेळेवर उपाय करा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या.