फोटो सौजन्य - Social Media
मुलांचे संगोपन म्हणजे केवळ नियम लादणे किंवा यशाची अपेक्षा ठेवणे एवढ्यावर मर्यादित नसते. प्रेम, शिस्त, समजूतदारपणा आणि संवाद यांचा योग्य मेळ साधणे ही खरी कसोटी असते. मात्र, काही पालक अति-कडक भूमिका घेतात. अशाच पद्धतीला ‘टायगर पॅरेंटिंग’ असे म्हटले जाते. टायगर पॅरेंटिंगमध्ये पालकांचा भर फक्त शिस्त, आदेश आणि परिपूर्णतेवर असतो. मुलांनी कोणताही प्रश्न न विचारता आज्ञा पाळाव्यात, अभ्यासात अव्वलच यावे, चुका करण्याची मुभा नसावी, अशी अपेक्षा ठेवली जाते. या सगळ्यात मुलांच्या भावना, आवडी-निवडी आणि मानसिक गरजा दुय्यम ठरतात. परिणामी, मुलांच्या नैसर्गिक वाढीवर याचा विपरीत परिणाम होतो.
नेपाळमधील त्रिभुवन विद्यापीठ तसेच ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या विविध संशोधनांमध्ये असे स्पष्ट झाले आहे की, अतिशय कठोर वातावरणात वाढलेल्या मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता दिसून येते. सततच्या दबावामुळे अशी मुले तणावग्रस्त राहतात आणि मानसिक अस्वस्थतेला सामोरे जातात. पालकांना वाटते की कडक वागणूक दिल्याने मुलं यशस्वी होतील, मात्र प्रत्यक्षात हा दबाव त्यांना आतून कमकुवत बनवतो.
मुलांच्या भविष्यासाठी केवळ नियमांची यादी तयार करून उपयोग होत नाही. त्यांना समजून घेणे, त्यांचे म्हणणे ऐकून घेणे आणि संवाद साधणे हे तितकेच महत्त्वाचे असते. जेव्हा पालक फक्त अधिकार गाजवतात, तेव्हा मुलांच्या मनात भीती रुजते. ही भीती पुढील आयुष्यात त्यांच्या निर्णयक्षमतेवर आणि नातेसंबंधांवरही परिणाम करते.
संशोधनानुसार, जे पालक मुलांकडून कोणत्याही चर्चेशिवाय आज्ञापालनाची आणि प्रत्येक गोष्टीत परफेक्ट असण्याची अपेक्षा करतात, त्यांच्या मुलांमध्ये नैराश्य आणि चिंतेचा धोका अधिक असतो. १० ते १८ वयोगटातील मुलांवर केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की, ज्या घरांमध्ये मोकळा संवाद नसतो, तिथली मुले मानसिकदृष्ट्या अधिक तणावात असतात. अति-अपेक्षांचे ओझे त्यांच्या शिकण्याच्या आनंदावरही पाणी फेरते.
टायगर पॅरेंटिंगमध्ये मुलांच्या भावनांना फारसे स्थान नसते. स्वतःचे मत मांडण्याची संधी न मिळाल्याने मुलांना असुरक्षित वाटू लागते. चुका केल्यावर कठोर शिक्षा मिळेल या भीतीने ती मुले नवीन गोष्टी करण्यापासून दूर राहतात. भावनिक आधार न मिळाल्यामुळे ती हळूहळू एकटेपणाच्या गर्तेत जातात आणि पालकांशी दुरावा निर्माण होतो.
या कडक पालकत्वाचा परिणाम फक्त मानसिक पातळीवरच होत नाही, तर शारीरिक आणि जैविक पातळीवरही होतो. ब्रिटनमधील एका अभ्यासानुसार, सततचा तणाव मुलांच्या शरीरातील जैविक प्रक्रियांवर परिणाम करू शकतो. यामुळे भविष्यात तणाव हाताळण्याची क्षमता कमी होते आणि प्रौढावस्थेत डिप्रेशनसारख्या समस्यांचा धोका वाढतो.
याउलट, ज्या पालकांचा दृष्टिकोन समजूतदार, सहकार्याचा आणि संवादावर आधारित असतो, त्यांच्या मुलांचे मानसिक आरोग्य अधिक भक्कम असते. अशा पालकत्वात नियम असतातच, पण त्या नियमांमागची कारणेही मुलांना समजावून सांगितली जातात. मुलांचे म्हणणे ऐकून घेतल्याने त्यांचा आत्मसन्मान वाढतो आणि जबाबदारीची जाणीव विकसित होते.
तज्ज्ञांच्या मते, पालकांनी मुलांचे मित्र न होता प्रेमळ मार्गदर्शक असावे. घरात सुरक्षित, विश्वासाचं आणि आपुलकीचं वातावरण मिळाल्यास मुलांची सर्जनशीलता आणि निर्णयक्षमता खुलते. केवळ यशाच्या शर्यतीत ढकलण्यापेक्षा मुलांच्या मानसिक समाधानाला महत्त्व दिल्यास, ती मुले अधिक आनंदी, खंबीर आणि जबाबदार नागरिक म्हणून घडतात.






