गरोदरपणात धुम्रपान करणे किती धोकादायक (फोटो सौजन्य - iStock)
धुम्रपानामुळे फुफ्फुसांना हानी पोहोचते हे अनेकांना माहिती असले तरी, कमी लोकांना हे माहीत आहे की ते स्त्रीच्या प्रजनन क्षमतेवर, गर्भधारणेवर आणि बाळाच्या जन्मापूर्वी आणि नंतरही दुष्परिणाम करू शकते. हल्ली प्रजनन वयाच्या महिलांमध्ये धूम्रपानाचे प्रमाण वाढत चालले आहे. धूम्रपानाचा फुफ्फुसांवर परिणाम होतो, परंतु अनेकांना हे माहित नाही की ते प्रजनन आरोग्यावर आणि गर्भधारणेवर देखील परिणाम करते.
विविध अभ्यासांनुसार, प्रजनन वयोगटातील महिलांमध्ये धूम्रपानाचे प्रमाण वाढले आहे, विशेषतः २५ ते ३५ या वयोगटातील महिलामध्ये ही समस्या आढळते. धुम्रपान हे प्रजनन क्षमतेवरही परिणाम करते, गर्भधारणेच्या गुंतागुंतीची शक्यता वाढवते आणि गर्भाशयात आणि जन्मानंतर बाळाच्या विकासातदेखील अडचणी निर्माण करते. गर्भवती महिला धुम्रपान करत नसली तरी, सेकंड हँड स्मोकिंग अर्थात जोडीदार किंवा कुटुंबातील सदस्य धुम्रपान करत असतील तर तितकेच हानिकारक ठरु शकते. गर्भधारणेची योजना आखणाऱ्या महिलांनी त्यांच्या आणि त्यांच्या बाळाच्या आरोग्यासाठी धुम्रपान टाळणे गरजेचे आहे (फोटो सौजन्य – iStock)
काय सांगतात तज्ज्ञ
डॉ. पद्मा श्रीवास्तव, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स, लुल्लानगर, पुणे यांनी सांगितले की, गरोदरपणात धूम्रपान केल्याने आई आणि बाळाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. सिगारेटमध्ये असलेले विषारी रसायने जसे की निकोटीन, कार्बन मोनोक्साइड आणि टार हे प्लेसेंटा आणि गर्भाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी करतात. यामुळे गर्भाच्या वाढीत अडथळे येऊ शकतात, गर्भपात होऊ शकतो, अकाली जन्म होऊ शकतो आणि अगदी मृत बाळ जन्माला येऊ शकते. यामुळे आईला गर्भनाळेसंबंधी समस्या (जिथे प्लेसेंटा खूप लवकर गर्भाशयातून वेगळे होते) होण्याचा धोका देखील वाढतो, जी एक जीवघेणा परिस्थिती आहे.
शिवाय, निकोटीन गर्भाशयातील रक्तप्रवाहावर देखील परिणाम करते, ज्यामुळे गर्भाचा विकास मर्यादित होतो. निकोटीन आईच्या दुधात जाऊ शकते,ज्यामुळे बाळाची झोप, आहारातील पोषकता आणि दीर्घकालीन न्यूरोडेव्हलपमेंटमध्येही व्यत्यय येऊ शकतो. इतकेच नाही तर, धूम्रपान करणाऱ्यांना एक्टोपिक गर्भधारणा होण्याची आणि प्रसूती आणि प्रसूतीदरम्यान समस्या येण्याची शक्यता अधिक असते. इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) सारख्या प्रजनन उपचार घेणाऱ्या महिलांनीही धुम्रपान केल्यास त्यांच्या यशाचे प्रमाण कमी होते.
मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवल्यास महिला गरोदर राहू शकतात का? काय सांगतात तज्ज्ञ
धुम्रपानाचा बाळावर कसा परिणाम?
धुम्रपानाचा दुष्परिणाम
धुम्रपान करणाऱ्या मातांच्या पोटी जन्मलेल्या बाळांचे वजन कमी असण्याची शक्यता जास्त असते, ज्यामुळे भविष्यात त्या बाळाला विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात. अशा बाळाला सडन इन्फंट डेथ सिंड्रोम (SIDS), श्वसन संक्रमण, दमा आणि l वर्तणुकीशी संबंधित समस्यांचा धोका देखील जास्त असतो. गर्भधारणेदरम्यान धूम्रपान केल्याने बाळाच्या मेंदूच्या विकासावरही परिणाम होऊ शकतो आणि विकासात्मक अडचणींचा धोका वाढतो.
गर्भधारणेदरम्यान धुम्रपान केल्याने एपिजेनेटिक बदलांद्वारे बाळाच्या डीएनएमध्ये देखील बदल होतो, ज्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. गर्भवती मातांनी धूम्रपानाची सोडणे आणि निरोगी जीवन जगणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच विलंब न करता धूम्रपानची सवय सोडा असा सल्ला डॉ. पद्मा यांनी दिला.
धुम्रपानाचा धोकादायक परिणाम
डॉ. निशा पानसरे(फर्टिलिटी स्पेशालिस्ट, नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी, खराडी, पुणे) सांगतात की, गर्भधारणेदरम्यान धूम्रपान करणे अजिबात योग्य नाही कारण त्यामुळे बाळाला पहिला श्वास घेण्यापूर्वीच हानिकारक विषारी पदार्थांचा सामना करावा लागतो. धुम्रपान बाळाच्या मेंदूच्या विकासावर, फुफ्फुसांच्या कार्यावर आणि दीर्घकालीन आरोग्यावरही परिणाम करू शकते.
ज्या महिला आधीच गर्भवती आहेत त्यांच्यासाठी, धुम्रपान हा गर्भपात, एक्टोपिक प्रेग्नन्सीची शक्यता वाढवते आणि बाळाच्या वाढीवर परिणाम करते. धुम्रपान सोडणे हे आई आणि बाळ अशा दोघांचेही जीवन सुरक्षित ठेवते. महिलांनी गर्भधारणेदरम्यान निरोगी राहण्याची खात्री केली पाहिजे. गर्भवती महिलांनी यशस्वी गर्भधारणा आणि प्रसूतीसाठी प्रजनन सल्लागाराने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे.”
गरोदर महिलांसाठी किती फायदेशीर ठरतो योग? गायनॅकने सांगितले महत्त्व
या टिप्सचे पालन करा
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.