फोटो सौजन्य - Social Media
नाते अशी गोष्ट आहे, जी फार नाजूक असते. दोघेही जणं एकमेकांना समजून घेणारे असतील तर या नात्याइतकं मजबूत काही नाही. पण जेव्हा एकमेकांना समजणे टाळले जाते, तेव्हा नाते कोसळते आणि शेवटी उरतो तो दुरावा! प्रत्येकाच्या नशीबात नसतात जीवाला जीव देणारी माणसं! त्यामुळे जर आपल्याकडे असा कोणी तरी असेल तर त्याला जपून ठेवा. मग ती मैत्री असो वा प्रेम!
प्रत्येक नात्यामध्ये भांडण होत असतात. याउलट, भांडण नात्याला अधिक मजबूत करते पण तेव्हाच जेव्हा आपण एकमेकांना समजून घेतो. एखादे नाते टिकवण्यासाठी फार काही नाही करायची गरज नाही. फक्त तुमचा वेळ आणि थोडा दररोज स्वतःहून साधलेला संवाद! संवाद आणि वेळ या दोन गोष्टी गम सारखे कार्य करतात, जे एकमेकांना जोडून ठेवतात. लक्षात ठेवा, नातं एक दोरा आहे आणि या दोर्याची गाठ दोन्ही बाजूने जोर दिला तरचं घट्ट बांधली जाते. पण जोर फक्त एकाच बाजूने लावला जात असेल तर गाठ सुटते.
नात्यात एकमेकांपासून अपेक्षा असणे चुकीचं नाही. एखादा तुमची स्वतःहून काळजी करत असेल, तुम्हाला प्रेम देत असेल तर त्याचे ओझं कधीच वाटून घेऊ नका. याउलट त्यालाही समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमचा एक शब्द त्या व्यक्तीचा दिवस बनवू शकतो. हा मान्य आहे की त्याच्याकडून काही गोष्टी जास्त होत असतील, पण तो तुमच्यासाठीच आहे, इतकं लक्षात असू द्या. नात्यात किंवा मैत्रीत संवाद फार महत्वाचा असतो. थोडासा होणार बदल एखाद्याच्या जीवनशैलीवर परिणाम करतो.
कधी काळी आपण व्यस्थ असतो तर त्या व्यक्तीनेही आपल्याला समजून घेणे भाग आहे. पण त्या व्यक्तीची त्यामागे काहीच वाईट भावना नसते. त्याला तेव्हा तुमच्या संपूर्ण वेळेची नव्हे तर “हो… मी आहे तुझ्यासोबत” या भावनेची गरज असते, जी एका शब्दातही मांडता येऊ शकते. कदाचित कधी काळी तोही व्यस्थ असेल पण तो तुमच्यासाठी त्यातून वेळ काढत असेल. तुमच्या आनंदासाठी सतत झटत असेल. इतकं की त्याने तुम्हाला याची जाणीवही करून दिली नसावी की तो व्यस्थ आहे. कारण ती व्यक्ती तुम्हाला फार महत्व देत असते.
अशी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात आहे, मग तो कुणीही असावा “आपला प्रियकर किंवा मित्र किंवा इतर कुणी”. ते नाते जपण्यासाठी पुढाकार घ्या. कारण तो ही दुखावत असेल. त्यालाही दुःख होत असेल. थोडा सा संवाद आणि थोडा सा दिलेला वेळ, एखाद्या नात्याला आयुष्य देतं. बळ देतं. नात्यात जेव्हा संवाद कमी होतो, तेव्हा नाते पहिल्यासारखे उरत नाही.