रक्षाबंधनला बहिणीने भावाला दिले जीवनदान
रक्षाबंधन सणाला भाऊ आपल्या बहीणींचे संरक्षण करण्याचे वचन घेतात, पण मेघराज कापडनेसाठी (वय ४१ वर्ष) हा सण साजरीकरणाचा अर्थ वेगळा ठरला. मेघराज गंभीर आजारी पडला आणि त्याला किडनी प्रत्यारोपणाची गरज होती, अशावेळी त्याची बहीण त्याच्यासाठी रक्षक ठरली. नि:स्वार्थ कार्यामध्ये त्याची बहीण संजना शेखर पनपाटीलने (वय ४७ वर्ष) पुढाकार घेतला आणि तिची किडनी दान करत त्याचे जीवन वाचवले. फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथील वैद्यकीय टीमने नेफ्रोलॉजीचे संचालक व किडनी ट्रान्सप्लाण्ट फिजिशियन डॉ. हरेश दोडेजा यांच्या मार्गदर्शनांतर्गत धोरण आखले आणि प्रत्यारोपण यशस्वीपणे करण्यात आले, ज्यानंतर मेघराजला आरोग्यदायी जीवन जगण्याची दुसरी संधी मिळाली.
मेघराज किडनी प्रत्यारोपणाची गरज असल्याचे समजण्यापूर्वी सामान्य आनंदी जीवन जगत होता. आयटी प्रोफेशनल असलेला तो कोविड-१९ महामारीनंतर घरातून काम करत होता आणि त्याच्या पाच वर्षाच्या मुलाला मोठे होताना पाहत होता. त्याला गंभीर डोकेदुखीचा त्रास होऊ लागला, म्हणून त्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला, ज्यांनी त्याला दैनंदिन चाचण्या करण्यास सांगितल्या. पण त्या चाचण्यांमधून काहीच निदान झाले नाही. त्यानंतर तो नेफ्रोलॉजिस्टकडे गेला आणि निदान झाले की त्याला किडनीचा त्रास होत होता, ज्यानंतर औषधोपचार व आहार नियोजन सुरू झाले. पण त्याची स्थिती अधिक खालावली.
हे देखील वाचा: रात्री उशिरा जेवल्यामुळे उद्भवू शकतात आरोग्यासंबंधित ‘या’ गंभीर समस्या
त्यानंतर मेघराजने मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी सल्लामसलत केली. डॉक्टरांच्या निदर्शनास आले की त्याच्या किडनी काम करणे थांबल्या होत्या, म्हणून डायलिसिसचा सल्ला दिला. किडनी अतिरिक्त द्रवांचे आणि रक्तातील अपव्ययांचे फिल्टर करण्यास अक्षम ठरल्यास हा वैद्यकीय उपचार केला जातो, ज्यामुळे अवयवांना महत्त्वपूर्ण कार्य करण्यास मदत होते. पण, डायलिसिसचा मानसिक व शारीरिक ताण रूग्णासाठी मोठा होता आणि म्हणून व्यवहार्य पर्याय म्हणून किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला.
”रूग्णाला सुरूवातीला देण्यात आलेल्या स्टिरॉईड्समुळे त्याचे क्रिएटिनिन आटोपशीर पातळ्यांपर्यंत आणण्यास मदत झाली, तसेच त्याला सामना कराव्या लागणाऱ्या परिस्थितीबाबत, तसेच किडनी प्रत्यारोपणाबाबत विचार करण्यास वेळ मिळाला. त्याच्या या स्थितीबाबत कारण समजू शकले नाही. त्याच्या या स्थितीसाठी बालपणी झालेला संसर्ग कारणीभूत असू शकतो, जो त्याच्या शरीरामध्ये राहिला आणि कालांतराने किडनी खराब झाली. हे इतक्या संथगतीने होते की त्याचे सहजपणे निदान होत नाही. हे सामान्य आहे, कारण आपण नियमितपणे तपासणी करत नाही आणि परिणामत: त्याचे निदान होणे अवघड होते,” असे फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडचे नेफ्रोलॉजीचे संचालक आणि किडनी ट्रान्सप्लाण्ट फिजिशियन डॉ. हरेश दोडेजा म्हणाले.
हे देखील वाचा: चेहऱ्यावर नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी नियमित करा फेस योगा, फायदे ऐकून व्हाल थक्क
शस्त्रक्रिया आणि प्रत्यारोपणाबाबत सांगताना मेघराज कापडने म्हणाले, ”प्रत्यारोपणानंतरचा टप्पा माझ्या कुटुंबियांसाठी आव्हानात्मक काळ होता. मला तीन महिन्यांसाठी बेड रेस्ट करण्यास सांगण्यात आले आहे. पण आता, मी बरा झालो आहे. मी या प्रक्रियेदरम्यान साह्य करण्यासाठी माझ्या बहीणीचे तिने दाखवलेल्या धाडसासाठी, तसेच तिच्या कुटुंबाचे जितके आभार मानेन ते कमीच आहे. यंदाचा रक्षाबंधन सण अत्यंत खास आहे, कारण माझ्या शस्त्रक्रियेनंतर आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि आम्ही दोघेही बरे होत आहोत.” अवयव दाता आणि प्राप्तकर्ता आता प्रत्यारोपणानंतर सामान्य जीवन जगत आहेत. संजना पुन्हा तिच्या अध्यापन कामावर परतली आहे आणि मेघराज मनात कृतज्ञता ठेवत दैनंदिन जीवन जगत आहे.