फोटो सौजन्य - Social Media
स्त्रीचं आयुष्य अनेक जबाबदाऱ्यांनी भरलेलं असतं. ती मुलं, घर, काम आणि नवऱ्याच्या गरजा सांभाळत स्वतःचं अस्तित्व कधी हरवून बसते, हे तिलाही कळत नाही. पण तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात सतत एक अपेक्षा दडलेली असते. ती म्हणजे नवऱ्याच्या तोंडून प्रेमाचे काही शब्द ऐकण्याची. अनेक पुरुषांना वाटतं की, लग्नानंतर प्रेम व्यक्त करण्याची गरज उरत नाही, पण हे चुकीचं आहे. स्त्रीला फक्त सामान, वस्तू, पैसे यांचं नव्हे, तर भावनिक आधाराचीही गरज असते. म्हणूनच नवऱ्याने वेळोवेळी दिलेला भावनिक प्रतिसाद आणि कौतुकाचे शब्द तिच्या मनाला अत्यंत सुखावणारे असतात.
“तुला पाहिलं की दिवस छान जातो” हे शब्द तिला थकवा विसरायला भाग पाडतात. सकाळपासून रात्रीपर्यंत ती घराच्या कामात, ऑफिसमध्ये किंवा मुलांमध्ये इतकी गुंतलेली असते, की कोणीतरी तिची दखल घेतोय, हे जाणवणं तिच्यासाठी अमूल्य असतं. “तुझ्याशिवाय घर अपुरं वाटतं” हे वाक्य तिला तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देतं. कधी ती माहेरी गेली असेल किंवा काही काळासाठी घराबाहेर असेल, तेव्हा नवऱ्याने ही भावना बोलून दाखवली, तर ती अधिक जवळ येते.
“तू खूप चांगलं काम करतेस” किंवा “मी कायम तुझ्यासोबत आहे” असे शब्द तिच्यासाठी आधारस्तंभ ठरतात. प्रत्येक दिवशी ती जे जे करते, त्यासाठी धन्यवाद देणं म्हणजे तिच्या प्रयत्नांना मान्यता देणं होय. “आज तू फार सुंदर दिसतेस” असं अगदी सहज बोलल्याने तिच्या मनात फुलपाखरासारखं हलकं वाटतं. अनेकदा लग्नानंतर सौंदर्याचं किंवा आवडीनिवडींचं कौतुक लोप पावतं, पण हीच लहानशी दखल तिचं मन जिंकते.
“थँक यू, माझ्यासाठी इतकं केल्याबद्दल” हे एक वाक्य तिच्या मनात खोलवर घर करतं. घर, संसार, नातं सांभाळताना ती जे काही देते, त्यासाठी तिला केवळ मान्यता हवी असते. स्त्रियांसाठी प्रेम व्यक्त करणं म्हणजे महागडं गिफ्ट किंवा मोठे सरप्राइझ नाही, तर अशा साध्या, पण मनापासून उमटलेल्या शब्दांतून होतं. नवऱ्याच्या तोंडून आलेले प्रेमाचे, कौतुकाचे, आधार देणारे हे शब्द तिच्या मनाला आश्वस्त करतात आणि तुमच्या नात्यात नवचैतन्य निर्माण करतात. म्हणूनच, आजच हे शब्द मनापासून बोला… आणि पाहा, तुमचं नातं अधिक घट्ट, सुंदर आणि विश्वासार्ह होईल.