रोजच्या आहारात सुरण खाल्यामुळे आरोग्याला होतात चमत्कारीत फायदे
शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारात पालेभाज्या, फळभाज्या, फळे आणि कंदमुळांचे सेवन करणे आवश्यक आहे. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. आरोग्यासाठी कंदमूळ अतिशय गुणकारी ठरते. त्यात प्रामुख्याने सुरणाच्या भाजीचे सेवन केले जाते. सुरणाच्या कांद्यापासून भाजी, भजी आणि सुरण फ्राय इत्यादी पदार्थ बनवले जातात. मात्र आपल्यातील अनेकांना सुरण खायला आवडत नाही. पण आहारात कधीतरी सुरणाच्या भाजीचे सेवन करावे. यामध्ये कॅल्शियम, तांबे, जस्त, सेलेनियम, लोह, फॉस्फरस, लोह, मँगनीज आणि यांसारख्या आवश्यक खनिजे आढळून येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सुरण खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
सुरण हे एक पौष्टिक कंदमूळ असून ते केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायक आहे. आयुर्वेदात सुरणाला विशेष महत्त्व आहे. कारण, त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. सुरणामध्ये फायबर, अँटिऑक्सिडंटस्, सी व बी ६ ही जीवनसत्त्वे, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह भरपूर प्रमाणात असतात. सुरणामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असल्यामुळे त्याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते. यातील नैसर्गिक प्रोबायोटिक्समुळे गॅस, अपचन आणि ऍसिडिटी यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
आयुर्वेदानुसार सुरण हा रक्तशुद्धीकारक आहे. तो पुरळ आणि त्वचेच्या इतर समस्या दूर करण्यास मदत करतो. सुरणाच ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे तो मधुमेहींसाठी फायदेशीर आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवून इन्सुलिनची कार्यक्षमता, सुधारण्यासाठी मधुमेहींनी सुरणाचे सेवन आवर्जून करावे. सुरणामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे तो रक्तदाब नियंत्रित ठेवतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारतो. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासही सुरण लाभदायक ठरतो. यामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंटस्मुळे फ्री रॅडिकल्सचा नाश होतो आणि कर्करोगापासून संरक्षण मिळते.
उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घेणार? ऍलर्जी होण्याचे प्रकार आणि कारणे कोणती? जाणून घ्या उपचार
सुरण खाण्यामुळे लवकर पोट भरल्यासारखे वाटते आणि अन्नाचे अतिरेकी सेवन टाळले जाते. त्यामुळे तो वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. अर्थात, सुरण कच्चा खाणे टाळावे. तो वाफवून, उकडून किंवा भाजून खाणे अधिक चांगले. सुरणाची भाजी, भरीत किंवा सुरणाचे वडे हे चविष्ट आणि आरोग्यदायी पर्याय आहेत. काही लोकांना सुरणामुळे ऍलर्जी किंवा घशात खवखव होऊ शकते.