डोळे हा शरिराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पण हेच डोळे अनेक आजारांची लक्षणंही दर्शवतात. डोळ्यांकडे नीट काळजीपूर्वक पाहिले तर आपल्याला आरोग्याबद्दल बऱ्याच गोष्टी समजू शकतात. डोळ्यांच्या बदलत्या रंगावरून बरंच काही कळू शकतं, डोळ्यांची स्थिती आणि बदलणारा रंग गंभीर आजार ओळखण्यास मदत करू शकतो. जितक्या लवकर आपण ते ओळखू तितक्या लवकर रोग गंभीर होण्यापासून रोखू शकाल. यासाठी काही निरिक्षणं गरजेची आहेत. त्याविषयी जाणून घेऊयात,
कॅन्सर – स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे तुमच्या डोळ्यांतही दिसू शकतात. जेव्हा कर्करोगाच्या पेशी शरीराच्या इतर भागात पसरू लागतात तेव्हा त्याचा परिणाम डोळ्यांवर होऊ लागतो. यूविया (uvea) (डोळ्यांमधील अस्तर) मुळे असे लक्षात येतं की, कर्करोगाच्या पेशी तुमच्या डोळ्यात पसरल्या आहेत. तुम्हाला अंधुक दिसणे, डोळा दुखणे किंवा चमकणे यासारख्या समस्या येत असल्यास तुमच्या डॉक्टरांशी नक्कीच संपर्क साधा.
उच्च कोलेस्टेरॉल- रक्तातील वाढलेले कोलेस्टेरॉल हळूहळू डोळ्यांमध्ये जमा होऊ लागतं. याचे सर्वात स्पष्ट लक्षण म्हणजे तुमच्या डोळ्याच्या बाहुलीभोवती पांढऱ्या किंवा निळ्या रंगाची वलय निर्माण होऊ लागते. वाढत्या वयासोबत अनेकांमध्ये हे लक्षण दिसत असले तरी परंतु याचे आणखी एक कारण म्हणजे उच्च कोलेस्ट्रॉल. जर तुम्हाला अशी कोणतीही लक्षणे दिसली तर नक्कीच तुमचे कोलेस्ट्रॉल तपासा. त्यामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढू शकतो.
मधुमेह – अंधुक दृष्टी ही डोळ्यांशी संबंधित एक सर्वसामान्य समस्या असू शकते. टाइप 2 मधुमेह असलेल्यांना देखील हा त्रास जाणवतो. रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्याने मज्जातंतूंवर ताण येतो. त्यामुळे डोळ्यांच्या मागील बाजूस रक्ताचे डाग दिसतात. या ब्लड स्पॉट्सचा अर्थ असा होतो की, तुमची रक्तातील साखरेची पातळी धोकादायक पातळीवर पोहोचली आहे आणि तुम्हाला त्याकडे त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे. रक्तातील साखरेच्या पातळीची वेळीच काळजी घेतली नाही तर त्यामुळे डोळ्यांची दृष्टी कायमची नष्ट होऊ शकते.
डोळयातील पडदा (रेटिना) – डोळयातील पडद्याभोवती लहान ठिपके येणं त्याला आय फ्लोटर्स असे म्हणतात. हे अगदी सर्वसामान्य आहे आणि प्रत्येकाला ते जाणवू शकते. परंतु, या फ्लोटर्सची वाढती संख्या रेटिनल टियर घातक आहे. या लक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. कारण, काही काळानंतर यामुळे आपल्या डोळ्यांना गंभीर नुकसान होऊ शकते.
संसर्ग – कॉर्नियावर पांढरे डाग दिसणे हे कॉर्नियल संसर्गाचे लक्षण असू शकते. चष्म्याऐवजी कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्या लोकांमध्ये हे जास्त दिसून येते. बॅक्टेरिया सहजपणे लेन्समध्ये प्रवेश करतात आणि त्यांच्यामुळे संसर्ग पसरतो. यामुळे कॉर्नियल डाग दिसणं आणि वेदना होऊ शकतात.
कावीळ – डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा झाला तर ते कावीळ झाल्याचे लक्षण असू शकते. कावीळ ही रक्तातील जास्त बिलीरुबिन (लाल रक्तपेशींच्या विघटनाने तयार होणारा पिवळा पदार्थ) मुळे उद्भवणारी स्थिती आहे. जेव्हा तुमचे यकृत रक्त योग्यरित्या फिल्टर करू शकत नाही तेव्हा बिलीरुबिनचे प्रमाण भरपूर प्रमाणात वाढते. अशा स्थितीत लघवी आणि त्वचाही पिवळी पडू लागते.