लैंगिक आणि प्रजनन समस्येवर जागरूकता का महत्त्वाची आहे (फोटो सौजन्य - iStock)
लैंगिक व प्रजनन आरोग्य जागरूकता दिन हा महिलांना त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आरोग्याबाबत सजग राहण्याची आठवण करून देणारा दिवस आहे. बदलती जीवनशैली, कामाचा ताण, संतुलित आहाराचा अभाव, अपुरी झोप आणि उशिरा केले जाणारे कुटुंब नियोजन यामुळे महिलांमध्ये प्रजनन आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र वेळेत निदान झाल्यास यातील बहुतांश समस्या टाळता किंवा नियंत्रित करता येऊ शकतात. डॉ. प्रसाद कुलट, वरिष्ठ प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन, पुणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 2026 मध्ये महिलांनी दुर्लक्ष करू नयेत अशा लैंगिक व प्रजनन आरोग्य समस्या नक्की काय आहे आपण जाणून घेऊया.
अनियमित मासिक पाळी
अनेक महिलांमध्ये अनियमित पाळी, अतिरक्तस्राव, तीव्र पोटदुखी किंवा पाळी चुकणे या समस्या वाढत आहेत. दीर्घकाळचा ताण, वजनातील बदल आणि हार्मोन्समधील असंतुलन यामुळे हे त्रास होऊ शकतात. मात्र ही लक्षणे थायरॉईड विकार किंवा पीसीओएससारख्या आजारांचे संकेत असू शकतात. त्यामुळे अशा बदलांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS)
पीसीओएस हा महिलांमधील एक सामान्य हार्मोनल विकार असून त्यामुळे अनियमित मासिक पाळी, मुरूम, चेहऱ्यावर किंवा शरीरावर जास्त केस येणे, वजन वाढणे आणि वंध्यत्व यासारख्या समस्या उद्भवू शकतात. हल्ली हा आजार दर १० पैकी ८ महिलांमध्ये असल्याचे आढळते. याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. पण त्याची वेळीच काळजी घेतली पाहिजे.
प्रजनन प्रणालीचा संसर्ग (Reproductive Tract Infections)
प्रजनन प्रणालीचा संसर्ग म्हणजे गर्भाशय, फॅलोपियन ट्यूब, अंडाशय किंवा जननेंद्रियांच्या भागाला होणारा जंतुसंसर्ग आहे. हे संसर्ग जीवाणू, विषाणू, बुरशी किंवा परजीवीमुळे होतात. महिलांमध्ये बॅक्टेरियल व्हॅजिनोसिस, यीस्ट इन्फेक्शन आणि ट्रायकोमोनियासिस हे सामान्य संसर्ग आहेत. वेळीच उपचार न केल्यास पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज, दीर्घकालीन वेदना आणि वंध्यत्वाचा धोका निर्माण होऊ शकतो.
लैंगिक संपर्कातून होणारे संसर्ग (STIs) :
एचपीव्ही, क्लॅमिडिया आणि हर्पीससारखे लैंगिक संसर्ग आता कमी वयातील महिलांमध्येही मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. यासाठी वेळीच तपासणी आणि योग्य उपचार करणे गरजेचे आहे. अनेक महिलांना या आजारांबाबत माहिती नसते आणि ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहचून त्याची जागरूकता होणे अत्यंत गरजेचे आहे.
वंध्यत्वाशी संबंधित समस्या
सध्या उशिरा होणारे विवाह आणि त्यामुळे लांबणारी गर्भधारणा याचे प्रमाणही वाढत असल्याने वंध्यत्वाच्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. स्त्रीबीजांची संख्या कमी होणे, एंडोमेट्रिओसिस आणि हार्मोनल असंतुलन यामुळे गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो. आपल्या रोजच्या आहाराचाही परिणाम महिलांच्या आरोग्यावर होत असतो आणि त्यामुळे वंध्यत्वाचा धोकाही वाढतोय.
पुरुषांनो सावधान! वाढत चालली वंधत्वाची समस्या, Fertility वर गंभीर परिणाम; काय आहे कारण
रजोनिवृत्ती (Menopause) :
चाळिशी आणि पन्नाशीतील महिलांना रजोनिवृत्तीमुळे हॅाट फ्लॅश, मानसिक आरोग्यासंबंधी येणारी आव्हानं, योनी मार्गाचा कोरडेपणा आणि झोपेच्या तक्रारी जाणवू शकतात. ही लक्षणे जाणवल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. तसंच हल्ली चुकीच्या खाण्याच्या पद्धतीमुळे अगदी वयाच्या चाळिशीतच रजोनिवृत्ती येण्याची समस्या वाढली आहे.
वरील समस्यांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. महिलांनी लैंगिक आणि प्रजनन आरोग्याशी संबंधित समस्यांविषयी तज्ज्ञांची चर्चा करणे गरजेचे असून वेळीच उपचाराने या दूर करता येऊ शकतात. गैरसमज आणि सामाजिक दबावामुळे यावर उपचार टाळणे धोकादायक ठरू शकते. योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
कसा टाळता येईल धोका
योग्य वजन राखणे, संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम, ध्यानधारणा, पुरेशी झोप, सुरक्षित लैंगिक संबंध आणि नियमित तपासण्या या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. मासिक पाळीतील बदल, वेदना किंवा इतर लक्षणांकडे दुर्लक्ष न करता स्वमर्जीने औषधे न घेता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
नियमित स्त्रीरोग तपासणी, पॅप स्मिअर, एचपीव्ही तपासणी आणि हार्मोनल चाचण्या वेळीच आरोग्य समस्या ओळखता येतात आणि प्रजनन क्षमता सुधारता येते. त्यामुळे 2026 मध्ये महिलांनी आपल्या लैंगिक व प्रजनन आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.






