काय आहे समस्या (फोटो सौजन्य - iStock)
प्रजनन समस्या पुरुष आणि महिला दोघांनाही होऊ शकतात. महिलांमध्ये पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (PCOS), एंडोमेट्रिओसिस, थायरॉईड विकार, अंडाशयातील अंड्यांची संख्या किंवा गुणवत्ता कमी असणे अशा समस्या आढळतात. अनेक वेळा या समस्या सुरुवातीला कोणतीही लक्षणे न आढळून येता हळूहळू वाढतात. काही महिलांमध्ये मासिक पाळीची अनियमितता, ओटीपोटात वेदना किंवा हार्मोनल असंतुलन सारख्या समस्या दिसून येतात, मात्र अनेकांना कोणतीही लक्षणं जाणवत नाहीत. पुरुषांमध्येही शुक्राणूंची संख्या कमी होणे, त्यांची गुणवत्ता कमी होणे किंवा हार्मोनल असंतुलन अशा समस्या आढळून येतात. बहुतेक वेळा गर्भधारणेत समस्या आल्यानंतरच या समस्यांकडे गांभीर्याने पाहिले जाते. त्यामुळे वेळीच प्रजनन तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे.
काय सांगतात तज्ज्ञ
मुंबईतील अपोलो डायग्नोस्टिक्स च्या रिजनल टेक्निकल हेड डॉ. उपासना गर्ग यांनी सांगितले की, प्रजनन तपासणी ही केवळ एखादी आरोग्य समस्या निर्माण झाल्यावरच करायची असे नसून नियमितपणे ही तपासणी करणे गरजेचे आहे. महिलांसाठी ओव्हुलेशन ट्रॅकिंगद्वारे अंडी नियमितपणे तयार होऊन ती फुटत आहेत का हे तपासले जाते. हार्मोनल चाचण्यांमध्ये एएमएच, एफएसएच, एलएच, प्रोलॅक्टिन आणि थायरॉईड प्रोफाइलद्वारे स्त्रीबीजांची संख्या व गुणवत्ता समजते. तसेच अल्ट्रासाऊंडसारख्या तपासण्यांद्वारे गर्भाशय व फॅलोपियन ट्यूबमध्ये काही अडचण आहे का हे तपासले जाते. पुरुषांसाठी वीर्य तपासणीद्वारे शुक्राणूंची संख्या, हालचाल आणि त्यांची रचना तपासली जाते. या सर्व चाचण्यांमुळे वेळीच योग्य त्या समस्येचे निदान करण्यास मदत होते.
नोकरी करणाऱ्या जोडप्यांमध्ये अधिक समस्या
तज्ज्ञांनी पुढे सांगितले की, २५ ते ३७ वयोगटातील जवळपास १० पैकी ६ नोकरी करणारी जोडपी प्रजनन तपासणीस विलंब करतात. यापैकी सुमारे ४० टक्के जोडप्यांना वंध्यत्वाशी संबंधित अंतर्निहित समस्या असू शकतात. अशा जोडप्यांना आयव्हीएफ, आयसीएसआय किंवा आयुआय सारख्या सहाय्यक उपचारांची गरज भासू शकते. वेळीच तपासणी केल्यामुळे नैसर्गिक गर्भधारणेची शक्यता वाढते, भावनिक ताण कमी होतो आणि पुढील गुंतागुंत टाळता येते.
40 नंतरही मजबूत करतील Fertility ‘हे’ 5 पदार्थ, महिला आणि पुरुषांनी आहारात समाविष्ट कराच
प्रजननाबाबत योग्य माहिती नसणे
मुंबईच्या झायनोवा शाल्बी हॉस्पिटलचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. परिक्षित टँक यांनी सांगितले की, बऱ्याच नोकरी करणाऱ्या जोडप्यांना प्रजनन आरोग्याबाबत पुरेशी माहिती नसते. व्यस्त जीवनशैलीमुळे तपासणीस विलंब होतो, मात्र वय आणि जीवनशैलीचे घटक आपल्या प्रजननक्षमतेवर परिणाम करतात.
त्यांच्या मते, जोडप्यांनी हार्मोन चाचण्या, अल्ट्रासाऊंड, ओव्हेरियन रिझर्व तपासणी आणि वीर्य विश्लेषण या मूलभूत तपासण्या वेळीच करुन घेणे गरजेचे आहे. यामुळे त्यामुळे वेळीच समस्या ओळखता येते आणि आहार, व्यायाम, योग, ध्यान तसेच आवश्यक उपचारांद्वारे योग्य नियोजन करता येते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नियमित आरोग्य तपासणीप्रमाणेच प्रजनन तपासणी ही देखील तितकीच महत्त्वाची आहे. वेळीच तपासणी केल्यास गर्भधारणेची शक्यता वाढते आणि मानसिक ताण कमी होतो.






