आज महापौर निवडीची औपचारिक घोषणा होणार
नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या सतराव्या महापौराची औपचारिक घोषणा आज (दि. ६) करण्यात येणार असून, त्यासाठी सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वाधिक नगरसेवक असलेल्या भाजपने महापौरपदासाठी हिमगौरी आडके यांची तर उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांच्या नावाची घोषणा केली आहे. महापौर व उपमहापौर पदासाठी अनुक्रमे ठाकरे गट व शिंदे सेनेनेही उमेदवार उतरविल्याने सभागृहातील राजकीय डावपेच पाहण्यासारखे असेल.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा बोलवण्यात आली आहे. या निवडणुकीपूर्वी पूर्वसंध्येला अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. सर्वाधिक नगरसेवक असलेल्या भाजपने पक्ष फुटीच्या शक्यतेने आपल्या नगरसेवकांना अज्ञात ठिकाणी रवाना केले. त्यातही पक्षातील राजी नाराजी समोर आल्याने काही नगरसेवकांनी जाण्यास नकार दिला. तर विरोधकांनीही आपले संख्याबळ टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले.
हेदेखील वाचा : Baramati Plane Accident: बारामती विमान अपघातप्रकरणी अरविंद सावंतांची मोठी मागणी; तांत्रिक त्रुटींकडेही वेधलं लक्ष
भाजपमध्ये सर्वाधिक जागा मिळूनही नाराजी तर अल्प बळ असलेल्या विरोधकांमध्ये ही सत्तेची फळे चाखता यावीत, यासाठी चढाओढ लागली. शिंदे सेनेला भाजपकडून उपमहापौर पद मिळण्याची अपेक्षा असल्याने या पक्षात उपमहापौर पदाचा अर्ज भरण्यावरून रस्सीखेच झाली. बंटी तिदमे, विलास शिंदे, राहुल दिवे यांनी अर्ज दाखल केले.
शुक्रवारी पक्ष कोणाच्या पारड्यात कौल टाकतो हे महत्त्वाचे. ठाकरे गटाने महापौर पदासाठी सीमा पवार यांचा अर्ज दाखल केला आहे. अन्य पक्षांची भूमिका सभागृहात समोर येईल.
मनसे सेनेबरोबर गेल्याने महाविकास आघाडीला धक्का
मनसेकडून निवडून आलेल्या एकमेव नगरसेविका मयुरी अंकुश पवार यांनी गुरुवारी सकाळी शिंदे सेनेबरोबर जाण्याचा निर्णय घेत, गटाची नोंदणी केली. त्यामुळे महाविकासला मोठा धक्का बसला आहे. अन्य राजकीय पक्षांची सभागृहात काय भूमिका असेल त्याकडे लक्ष लागले आहे.
भाजपचे 72 तर शिवसेनेचे 26 नगरसेवक
मनपा निवडणुकीत भाजपचे ७२ नगरसेवक निवडून आले. शिंदे सेनेचे २६, ठाकरे गटाचे १५, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ४, काँग्रेसचे ३ व मनसे, अपक्ष प्रत्येकी एक जागा मिळाली. त्यामुळे सर्वाधिक नगरसेवक असलेल्या भाजपने स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
मंत्री महाजानांनी बैठक घेऊन जाहीर केली उमेदवारांची नावे
महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव निघाल्याने भाजपातच अनेक इच्छुक तयार झाले. पहिल्या दिवसापासून हिमगौरी आडके यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्यापाठोपाठ स्वाती भामरे, दीपाली गिते, दीपाली कुलकर्णी, जुई शिंदे यांच्या नावाची चर्चा केली गेली. त्यामुळे पक्षाने काही नावे श्रेष्ठीकडे पाठविले. मंगळवारी मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन त्यात महापौरपदासाठी हिमगौरी आडके यांची तर उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांच्या नावांची घोषणा केली.
हेदेखील वाचा : Mumbai Goa Highway : महामार्गावर भीषण अपघात; गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या वाहनाचा स्फोट






