हे तृणधान्य पचण्यासाठी अत्यंत हलके आहे. त्यामुळे लहान मुले, वृद्ध मंडळी व आजारातून उठलेल्या व्यक्तींसाठी ते अगदी फायद्याचे आहे.
पण ज्यांना तब्येत बनवायची आहे, मासंवर्धन करायचे आहे. अशांना नाचणीचा तितकासा उपयोग होत नाही.
पण, तरीही नाचणीमध्ये एक वैशिष्ट्य आहे ती शरीराला काटकपणा आणते.
जसा गहू बलवर्धक, ज्वारी बुद्धिवर्धक तशी नाचणी ही शरीराला सडसडीतपणा आणणारी आहे.
ज्यांना अंगावर अतिरिक्त चरबी नको आहे अशांनी नाचणीची भाकरी व ताक एका वेळच्या जेवणात ठेवावे कुठलाही थकवा न जाणवता मेद कमी होण्यास निश्चित मदत होते.
100 ग्रॅम नाचणीत तब्बल 344 मिलिग्रॅम कॅल्शियम असते.
ही नाचणी वाढीच्या मुलांना व गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना देण्यात येते.
आपण नाचणीची पेज, खीर, खांडवी असे पदार्थ तयार करू शकतो.
मैदा वापरून तयार करण्यात आलेली बिस्किटे देण्यापेक्षा मुलांना साजूक तुपातील नाचणीची बिस्किटे किंवा शंकरपाळे करून द्यावेत.
नेहमीच्या घावन, धिरडं, थालीपिठात थोडे नाचणीचे पीठ घातल्यास कॅल्शियमचा नक्कीच फायदा मिळू शकतो.
जे वयोवृद्ध आहेत अशा लोकांसाठी नाचणी पेज हे अमृतासमान आहे.
ज्यांना पोटाच्या संबंधित काही तक्रारी असतील, पचनाचे जुने विकार असतील, आशांनी आहारामध्ये ज्वारी-बाजरी, गव्हापेक्षा नाचणी व तांदळाचा वापर करावा.
मधुमेहींनी सुद्धा तांदळा ऐवजी नाचणी व दालचिनी मिश्रित ताकाचा वापर केल्यास फायद्याचे ठरेल.
नाचणीमध्ये कॅल्शियम आणि खनिजद्रव्य हाडे आणि दातांच्या वाढीसाठी बळकटीकरणासाठी आणि मजबुतीसाठी कायम ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत.
विशेष करून मध्यमवयीन आणि वयस्कर स्त्री-पुरुषांमध्ये हाडासंदर्भात हाडांचा ठिसूळपणा गुडघेदुखी जास्त प्रमाणामध्ये आढळून येते याचे मुख्य कारण म्हणजे खनिज द्रव्यांचा अभाव असणे. त्यांनी आहारामध्ये नाचणी समाविष्ट करावी.
नाचणीमध्ये तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात आहेत. नाचणीतील तंतुमय पदार्थाचे प्रमाण इतर कडधान्यांच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त आहे.
तंतुमय पदार्थ जास्त असल्या कारणाने नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. त्यामुळे मधुमेही व्यक्तींसाठी खूप उपयोगी आहे.
ग्लायसेमिक इंडेक्स कमी असणारे पदार्थ रक्तातील साखर एकदम वाढू देत नाहीत आणि त्यामुळे रक्तशर्करेवरचे नियंत्रण राहते.
तंतुमय पदार्थ रक्तातील कोलेस्टेरॉलवर सुद्धा नियंत्रण ठेवतात.
तंतुमय पदार्थाचे सेवन बद्धकोष्ठता होऊ देत नाही आणि बद्धकोष्टताची तक्रार असेल तर ती दूर करण्यास मदत करतात.