फोटो सौजन्य - Social Media
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे आपल्या दैनंदिन जीवनात अनेक सुविधा उपलब्ध झाल्या असल्या, तरी त्याचा अतिरेकी किंवा अंधाधुंध वापर गंभीर संकटांना कारणीभूत ठरू शकतो. अलीकडेच Annals of Internal Medicine Clinical Cases या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका घटनेने याची ठळक जाणीव करून दिली आहे. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतील डॉक्टरांच्या मते, एका तरुणाने आपल्या आहारातून पूर्णपणे क्लोराइड काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी ChatGPT कडून सल्ला घेतला. AI ने टेबल सॉल्ट (सोडियम क्लोराइड) ऐवजी सोडियम ब्रोमाइड वापरण्याचा पर्याय सुचवला. जवळपास तीन महिने हा सल्ला पाळल्यानंतर त्याची तब्येत बिघडली आणि त्याला थेट ICU मध्ये दाखल करावे लागले.
रुग्णामध्ये गोंधळ, वर्तनातील बदल, पाणी पिण्याची भीती, तसेच रुग्णालयातून पळून जाण्याचे प्रयत्न अशी गंभीर लक्षणे दिसू लागली. तपासणीत समोर आले की तो ब्रोमिझम म्हणजेच ब्रोमाइड विषबाधेने त्रस्त होता. तज्ज्ञांच्या मते, ब्रोमाइड इंटॉक्सिकेशन म्हणजे शरीरात ब्रोमाइडचे प्रमाण असामान्यरीत्या वाढणे. ही धोकादायक अवस्था मेंदू, नर्व्हस सिस्टीम आणि इतर महत्त्वाच्या अवयवांना हानी पोहोचवते. पूर्वी याचा वापर झोप व मिर्गीच्या औषधांमध्ये होत असे, परंतु आता तो अत्यल्प प्रमाणात केला जातो. ब्रोमाइडचे प्रमाण दूषित पाणी किंवा अन्न, रासायनिक कारखान्यांतील संपर्क, किंवा दीर्घकाळ ब्रोमाइडयुक्त औषधे घेण्यामुळे वाढू शकते.
याची मुख्य लक्षणे म्हणजे थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे, स्मरणशक्ती कमी होणे, बोलण्यात अडचण, स्नायूंमध्ये थरथर, श्वसनातील त्रास, आणि गंभीर स्थितीत बेशुद्धी किंवा कोमा. बचावासाठी, डॉक्टरांचा सल्ला न घेता कोणतेही औषध दीर्घकाळ वापरू नये, रसायनांच्या संपर्कात येताना योग्य सुरक्षा साधनांचा वापर करावा, आणि लक्षणे जाणवताच त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी. हे प्रकरण स्पष्ट दाखवते की आरोग्यविषयक सल्ल्यासाठी फक्त AI वर अवलंबून राहणे अत्यंत धोकादायक ठरू शकते.