फोटो सौजन्य - Social Media
येणाऱ्या 15 ऑगस्टला देशभरात स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात आणि जल्लोषात साजरा होणार आहे. शाळा, महाविद्यालये तसेच विविध शैक्षणिक संस्थांमध्ये या निमित्ताने अनेक उपक्रम राबवले जातील. मात्र, मुलांना फक्त शाळा आणि पुस्तकांमधूनच नव्हे, तर घरातही देशाचा इतिहास आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या वीरांच्या कथा सांगणे ही पालकांची महत्त्वाची जबाबदारी आहे. अशा कथांमुळे लहानपणापासूनच मुलांच्या मनात देशाबद्दलचा आदर आणि प्रेमाची भावना घट्ट रुजते. म्हणूनच, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पालकांनी आपल्या मुलांना या दिवसाचे महत्त्व आणि देशाचा गौरवशाली इतिहास समजावण्यासाठी पाच सोपे आणि रोचक उपाय अवलंबावेत.
घरातच एक छोटेखानी प्रश्नमंजुषा घेता येईल, ज्यामध्ये 15 ऑगस्टशी संबंधित प्रश्न विचारता येतील. उदा. भारताला स्वातंत्र्य कोणत्या वर्षी मिळाले? पहिले पंतप्रधान कोण होते? राष्ट्रीय ध्वज कोणी डिझाइन केला? योग्य उत्तर देणाऱ्या मुलांना छोटेखानी बक्षीस देऊन त्यांना प्रोत्साहन देता येईल. अशा पद्धतीने खेळत खेळत मुलांना देशाचा इतिहास आणि स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व समजू शकते.
टीव्ही हेदेखील मुलांना या दिवसाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रभावी माध्यम आहे. स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतात, तिरंगा फडकावतात आणि भव्य परेड तसेच देशभक्तीपर कार्यक्रम होतात. हे पाहताना मुलांना त्या क्षणाची ऐतिहासिक आणि भावनिक महत्ता अनुभवता येते. यावर्षी 15 ऑगस्टला लॉन्ग विकेंड असल्याने, पालक मुलांना एखाद्या ऐतिहासिक स्थळी घेऊन जाऊ शकतात. बाहेर जाणे शक्य नसेल, तर शहरातीलच स्वातंत्र्य संग्रामाशी किंवा इतिहासाशी संबंधित स्थळांना भेट देता येईल. यामुळे मुलांचा देशाशी भावनिक संबंध अधिक घट्ट होईल.
तसेच, मुलांना स्वातंत्र्य सेनान्यांवरील चित्रपट दाखवणे हाही उत्तम पर्याय आहे. महात्मा गांधी, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई यांच्यावर आधारित चित्रपट मुलांना त्या वीरांच्या संघर्षाची आणि त्यागाची जाणीव करून देतील. याशिवाय, त्यांच्या वय आणि समजुतीनुसार इतिहासावरील पुस्तके भेट देऊन वाचनाची सवय लावल्यास त्यांचे ज्ञान वाढेल आणि देशाबद्दलचा अभिमान व आपुलकीची भावना आणखी दृढ होईल.