फोटो सौजन्य - Social Media
सकाळी झोपेतून उठून आरशात पाहिल्यावर अनेकदा चेहरा फुगलेला, डोळ्यांभोवती सूज आलेली आणि एकंदर थकलेला दिसतो. यामुळे चेहऱ्याचा फ्रेशपणा निघून जातो आणि दिवसाची सुरुवातच कंटाळवाणी वाटते. बहुतांश लोक ही समस्या केवळ अपुरी झोप किंवा जास्त थकवा यामुळे होते असे समजतात. मात्र प्रत्यक्षात सकाळी चेहऱ्यावर सूज येण्यामागे काही रोजच्या सवयी, आहार आणि झोपेची पद्धत कारणीभूत असतात. त्यामुळे ही समस्या टाळण्यासाठी झोपण्याआधी योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक ठरते.
चेहऱ्यावर सकाळी सूज येण्याचे प्रमुख कारण म्हणजे रात्रीचा चुकीचा आहार. झोपण्यापूर्वी जास्त मीठ, मसालेदार किंवा पॅकेज्ड पदार्थ खाल्ल्यास शरीरात पाणी साठते. हेच साठलेले पाणी सकाळी चेहऱ्यावर सूज म्हणून दिसून येते. तसेच उशिरापर्यंत मोबाइल, लॅपटॉप किंवा टीव्ही पाहणे, वेळेवर झोप न घेणे आणि सतत जागरण करणे यामुळे डोळ्यांभोवती फुगवटा वाढतो. शरीरात पाण्याची कमतरता असल्यासही शरीर स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी पाणी धरून ठेवते, ज्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसू शकतो. काही जणांना अॅलर्जी, सायनसचा त्रास किंवा हार्मोन्समधील बदलांमुळेही सकाळी चेहरा सुजलेला जाणवतो. ही समस्या कमी करण्यासाठी झोपण्याआधी चेहऱ्याची स्वच्छता आणि निगा राखणे फार महत्त्वाचे आहे. दिवसभर चेहऱ्यावर साचलेली धूळ, घाण, घाम आणि तेलकटपणा नीट स्वच्छ न केल्यास त्वचेच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे झोपण्याआधी चेहरा सौम्य पद्धतीने स्वच्छ करणे गरजेचे आहे.
रात्री चेहऱ्याला लावण्यासाठी कोरफड म्हणजेच अॅलोवेरा जेल हा एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय मानला जातो. कोरफडीमध्ये थंडावा देणारे आणि सूज कमी करणारे नैसर्गिक गुणधर्म असतात. शुद्ध कोरफडीचा जेल चेहऱ्यावर पातळ थराने लावून हलक्या हाताने मसाज केल्यास त्वचा शांत होते आणि सकाळी फुगवटा कमी झालेला दिसतो. गुलाब पाणी हा आणखी एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. कापसाच्या बोळ्याने गुलाब पाणी चेहऱ्यावर आणि विशेषतः डोळ्यांभोवती लावून झोपल्यास त्वचा ताजीतवानी राहते. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि डोळ्यांखालील सूज कमी होण्यास मदत मिळते.
ज्यांची त्वचा कोरडी आहे, त्यांनी बदाम तेल किंवा नारळ तेलाचा अतिशय हलका थर लावू शकतात. मात्र जास्त प्रमाणात तेल वापरणे टाळावे, कारण जड तेलामुळे चेहरा अधिक फुगल्यासारखा दिसू शकतो. हलक्या मसाजमुळे चेहऱ्यावर साचलेले अतिरिक्त पाणी कमी होण्यास मदत होते. काकडीचा रस हा देखील सूज कमी करण्यासाठी उपयुक्त नैसर्गिक उपाय आहे. काकडीचा थंडावा त्वचेला आराम देतो. झोपण्याआधी काकडीचा रस चेहऱ्यावर लावून वाळू दिल्यास सकाळी त्वचा अधिक फ्रेश आणि टवटवीत दिसते.
फक्त चेहऱ्यावर काय लावावे एवढेच नाही, तर झोपण्याची पद्धतही महत्त्वाची ठरते. खूप सपाट उशीवर झोपल्यास चेहऱ्यावर पाणी साठण्याची शक्यता वाढते. थोडी उंच उशी वापरल्यास हा त्रास कमी होतो. दिवसभर पुरेसे पाणी प्या, मात्र झोपण्याच्या अगदी आधी जास्त पाणी पिणे टाळा. तसेच रोज वेळेत झोपण्याची सवय लावा. या सोप्या सवयी आणि नैसर्गिक उपाय नियमितपणे केल्यास सकाळी उठल्यावर चेहरा सुजलेला न दिसता ताजातवाना, प्रसन्न आणि फ्रेश दिसू शकतो.






