फोटो सौजन्य - Social Media
जगभरात कोट्यवधी लोक आणि भारतात जवळपास 2 लाख नागरिक मल्टिपल स्क्लेरोसिस (MS) या जीवनमर्यादित करणाऱ्या न्यूरोलॉजिकल आजाराशी झुंज देत आहेत. चालणे, स्वयंपाक, आंघोळ किंवा लेकराला उचलणे यांसारखी साधी कामेसुद्धा या रुग्णांसाठी डोंगर चढण्याइतकी कठीण ठरतात. पण त्यांची ही झुंज बहुतेक वेळा समाजापासून अदृश्य राहते. या संघर्षांना आवाज देण्यासाठी रोश फार्मा इंडिया आणि मल्टिपल स्क्लेरोसिस सोसायटी ऑफ इंडिया (MSSI) यांनी “Walk In My Shoes” हा जनजागृती उपक्रम हाती घेतला आहे.
या मोहिमेअंतर्गत सिम्युलेशन झोन तयार करण्यात आला असून, भेट देणाऱ्यांना एम.एस. रुग्णांना भेडसावणारी चार प्रमुख लक्षणे संतुलन हरवणे, स्नायूंच्या हालचालींवर परिणाम, अस्पष्ट दिसणे आणि संवेदनाशक्ती कमी होणे. प्रत्यक्ष अनुभवता येतील. हा झोन 22 ते 24 ऑगस्टदरम्यान मुंबईतील फिनिक्स मार्केटसिटी आणि नवी दिल्लीतील सिलेक्ट सिटी वॉक मॉलमध्ये सुरू राहणार आहे. “अनुभवातून शिक्षण” या संकल्पनेतून एम.एस. रुग्णांच्या आयुष्याची खरी झलक येथे मिळणार आहे.
MSSI सचिव संदीप चिटणीस यांनी निदर्शनास आणले की, एम.एस. हा अदृश्य आजार असल्यामुळे रुग्णांना अपंगत्व प्रमाणपत्र मिळत नाही आणि सरकारी योजनांपासून ते वंचित राहतात. त्यामुळे आरोग्य विमा व RPWD कायद्यातील तरतुदींमध्ये बदल करून रुग्णांना न्याय मिळावा, हे आमचे ध्येय असल्याचे ते म्हणाले. न्यूरॉलॉजिस्ट डॉ. रमेश पाटणकर यांच्या मते, भारतात फक्त 10% एम.एस. रुग्णांनाच उच्च-प्रभावी उपचार (High-efficacy therapies) मिळतात. हे उपचार सर्वांसाठी परवडणारे आणि विमा कव्हरेजसह उपलब्ध होणे राष्ट्राच्या प्राधान्यक्रमात यायला हवे.
रोश फार्मा इंडिया सीईओ राज्जी मेधवान यांनी सांगितले की, “#WalkInMyShoes ही मोहीम केवळ जागरूकता वाढवणारी नसून सहानुभूती प्रज्वलित करणारी, रुग्णांचा आवाज बुलंद करणारी आणि आरोग्य व्यवस्थेत बदल घडवून आणण्याचा निनाद आहे.”
एम.एस. बहुतेक वेळा 20–40 वयोगटातील तरुणांना होतो आणि स्त्रियांमध्ये याचे प्रमाण दुप्पट-तिपटीने जास्त आहे. करिअर, कुटुंब आणि स्वप्नांच्या टप्प्यावर हा आजार जीवनमर्यादित अपंगत्वाकडे नेऊ शकतो. त्यामुळे लवकर निदान, योग्य उपचार आणि समाजातील सहानुभूती हीच एम.एस. रुग्णांसाठी खरी जीवनरेषा ठरते.