फोटो सौजन्य - Social Media
कोकणी ही भारतातील एक प्राचीन आणि समृद्ध भाषा असून तिचा उगम इंडो-आर्यन भाषाकुळात मानला जातो. ही भाषा मुख्यतः गोवा, महाराष्ट्र (कोकण किनारपट्टी), कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये बोलली जाते. कोकणी ही संविधानाच्या आठव्या अनुसूचीत समाविष्ट भाषांपैकी एक आहे आणि गोव्याची राजभाषा म्हणूनही मान्यता प्राप्त आहे. कोकणी भाषेचा उगम संस्कृत, प्राकृत आणि अपभ्रंश या भाषांपासून झाला आहे. काही भाषाशास्त्रज्ञ कोकणीला मराठीची उपभाषा मानतात, तर काहीजण तिला स्वतंत्र भाषा मानतात. मात्र, भाषाशास्त्रीय अभ्यासातून हे स्पष्ट होते की कोकणी ही स्वतंत्र भाषा असून तिचा विकास प्राचीन कोकण प्रांतात झाला.
कोकणी भाषेचा एक मोठा प्रश्न म्हणजे तिच्या प्रमाण स्वरूपाचा अभाव. कोकणी ही विविध राज्यांमध्ये, वेगवेगळ्या लिपींमध्ये आणि उच्चारभेदांसह बोलली जाते. उदाहरणार्थ, गोव्यात देवनागरी लिपीत कोकणी लिहिली जाते, तर कर्नाटकात कन्नड लिपी, केरळमध्ये मल्याळम लिपी आणि काही ठिकाणी रोमन लिपी वापरली जाते. या लिपीभेदांमुळे आणि प्रादेशिक प्रभावांमुळे एकसंध प्रमाण भाषा तयार होण्यात अडचणी आल्या आहेत. तथापि, 1987 मध्ये गोव्यात कोकणीला राजभाषा म्हणून मान्यता दिल्यानंतर देवनागरी लिपीतली गोमांतकी बोली ही प्रमाण कोकणी म्हणून स्वीकारण्यात आली. पण अजूनही सर्व क्षेत्रात ती सार्वत्रिकपणे स्वीकारली गेली नाही.
कोकणीचे प्रकार व उपभाषा:
कोकणी भाषेच्या प्रमुख उपभाषांमध्ये काही प्रकार समाविष्ट आहेत. त्यातील एक म्हणजे गोमंतकी कोकणी! ही बोली गोव्यातील प्रमुख भाषा असून राज्याची राजभाषा आहे. सारस्वत समाजात सारस्वत कोकणी बोलली जाते. कर्नाटक राज्यच्या दक्षिण भागात मंगळुरी कोकणी बोलली जाते. उत्तर कर्नाटक तसेच गोव्याच्या सीमेला लागून असलेला कर्नाटक राज्यातील जिल्हा कारवार येथे कारवारी कोकणी बोलली जाते, जी बोली गोमंतकी नंतर मराठीशी सगळ्यात जवळची असणारी दक्षिण कोकणी बोली आहे. केरळात मालाबार भागात राहणारे काही समाजांमध्ये केरळी कोकणी बोलली जाते.
महाराष्ट्रीय कोकणी मराठीची एकार्थी उपभाषा मानली जाते. राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर बोलल्या जाणाऱ्या कोळी, आगरी, कुपरी, East Indian Catholic बोली, कोकणा, वाडवळ बोली, बाणकोटी, चित्पावन बोली, संगमेश्वरी तसेच मालवणी आणि कुडाळी या सर्व बोलीभाषा महाराष्ट्रीय कोकणीचा भाग आहेत. या सर्व बोली मराठीशी जवळीक साधतात तसेच मराठी भाषेचा फार मोठा प्रभाव या कोकणी बोलींवर आढळून येतो. महाराष्ट्राच्या ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये या बोली आजही मोठ्या प्रमाणावर बोलल्या जातात.