फोटो सौजन्य - Social Media
भारतात आंब्यांच्या अनेक जाती आहेत. प्रत्येकाची चव, आकार तसेच बऱ्यापैकी गोष्टी भिन्न आहेत. पण हापूसला मात्र सर्वोच्च स्थान आहे. ‘हापूस’ किंवा ‘अल्फोन्सो’ म्हणून ओळखला जाणारा हा आंबा त्याच्या अप्रतिम स्वाद, सुवास आणि रेशमासारख्या पोतामुळे आंब्यांचा राजा म्हणून ओळखला जातो. प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोकण भागात म्हणजे रत्नागिरी, देवगड, सिंधुदुर्ग आणि रायगड येथे हापूस आंब्याची लागवड केली जाते. या भागातील लालसर माती, दमट हवामान आणि समुद्राच्या सान्निध्यामुळे इथे उत्पादित होणाऱ्या हापूसला खास चव आणि सुगंध प्राप्त होतो.
हापूस आंब्याचा रंग सुवर्णपिवळसर असून त्यावर लालसर छटा असते. त्याचा बाटा अतिशय गोडसर, रसरशीत आणि तंतुमुक्त असतो. सर्वसामान्यतः एक हापूस आंबा 200 ते 250 ग्रॅम वजनाचा असतो. हापूसच्या मोहक सुवासामुळे तो इतर आंब्यांपेक्षा वेगळा ओळखता येतो. देवगडचा हापूस आकाराने थोडा लांबलचक असतो, तर रत्नागिरीचा आंबा थोडा गोलसर दिसतो.
हापूस आंबा खरा आहे की नाही हे ओळखणे आज गरजेचे झाले आहे, कारण बाजारात नकली हापूसची विक्री वाढली आहे. खऱ्या हापूसमध्ये नैसर्गिक सुवास असतो, त्याची साली गुळगुळीत आणि रंग एकसंध असतो. तो हातात घेतल्यावर त्याच्या सुगंधानेच खरी ओळख पटते. सध्या अनेक शेतकरी QR कोड लावून आंब्याची सत्यता सिद्ध करत आहेत, ज्यामध्ये त्या आंब्याची शेती, शेतकरी, गाव व कधी काढणी झाली याची माहिती असते.
हापूसची देशात आणि परदेशातही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. तो विशेषतः अमेरिका, जपान, कोरिया, युरोपमध्ये निर्यात केला जातो. त्याच्या निर्यातीमुळे कोकणातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे. हापूस हा केवळ एक फळ नसून, तो कोकणच्या संस्कृतीचा आणि गौरवशाली परंपरेचा अविभाज्य भाग आहे.