फोटो सौजन्य - Social Media
नातेसंबंधांमध्ये छोटे-मोठे वाद आणि गैरसमज होणे हे स्वाभाविक आहे. अनेकदा असे म्हटले जाते की भांडण हे प्रेमाचे लक्षण असते, परंतु कधी कधी या वादांमुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. काही जोडपी एकाच घरात राहूनही एकमेकांपासून भावनिकदृष्ट्या दूर होतात. ते एकमेकांशी संवाद साधत नाहीत, एकत्र वेळ घालवत नाहीत किंवा त्यांच्यातील जवळीकही हरवत जाते. या प्रकारच्या नातेसंबंधास रूममेट सिंड्रोम असे म्हणतात. या सिंड्रोममध्ये जोडप्यांचे नाते केवळ जबाबदाऱ्यांपुरते मर्यादित राहते आणि प्रेमभावना मागे पडते.
रूममेट सिंड्रोम ओळखण्यासाठी काही प्रमुख लक्षणे दिसून येतात. यामध्ये नात्यातील रोमांच कमी होणे, भावनिक जवळीक हरवणे, संवादाचा अभाव, शारीरिक संबंधांमध्ये दुर्लक्ष, जबाबदाऱ्या पार पाडणे पण प्रेमभावना न दाखवणे यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. हा सिंड्रोम मुख्यतः दोघांतील व्यस्ततेमुळे निर्माण होतो. नात्याच्या सुरुवातीला दोघेही एकमेकांना भरपूर वेळ देतात, परंतु जबाबदाऱ्या वाढू लागल्यावर ही जवळीक हळूहळू कमी होऊ लागते. जर वेळीच लक्ष दिले नाही, तर अशा परिस्थितीमुळे नात्यात अधिक दुरावा निर्माण होऊ शकतो.
या समस्येवर मात करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय करता येतात. सर्वप्रथम, हे स्वीकारणे गरजेचे आहे की नात्यात काही समस्या निर्माण झाल्या आहेत आणि त्या सोडवण्याची जबाबदारी दोघांनी घ्यावी. संवाद हा कोणत्याही नात्यात सुधारणा करण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग आहे. मनातील भावना उघडपणे व्यक्त करणे आणि समोरच्याच्या भावना ऐकणे हे नात्यातील गैरसमज दूर करण्यासाठी मदत करू शकते. तसेच, कामाच्या व्यापातून वेळ काढून जोडीदारासोबत वेळ घालवणे आवश्यक आहे. एकत्र वेळ घालवल्यास दोघांमधील जवळीक वाढते आणि नात्यातील दुरावा कमी होतो.
याशिवाय, कधी तरी एकत्र प्रवास करणे फायद्याचे ठरते. नव्या ठिकाणी जाण्याने नात्यात उत्साह निर्माण होतो आणि दोघांना एकमेकांसोबत अधिक वेळ घालवता येतो. अहंकारामुळे नात्यात तणाव वाढतो, त्यामुळे इगो बाजूला ठेवून जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक परिस्थितीला केवळ तर्कशुद्ध विचारसरणीने न पाहता कधी कधी हृदयानेही निर्णय घेणे गरजेचे असते. यामुळे दोघांचेही भावनिक संतुलन राखले जाते आणि नाते अधिक दृढ होते. रूममेट सिंड्रोम हा गंभीर समस्या असली तरी वेळेवर लक्ष दिल्यास त्यावर मात करता येते. नात्यातील प्रेम टिकवण्यासाठी संवाद, समजूतदारपणा आणि एकमेकांना वेळ देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.






