मूत्रपिंड खराब होणं किंवा लपलेल्या किडनी ट्युमरची सुरुवातीची लक्षणे असू शकतं, तज्ज्ञांचा इशारा
मुंबई: अनेकांना सतत पाठदुखीचा त्रास होतो आणि ते त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सहज उपलब्ध होणारी वेदनाशामक औषधे घेतात. या औषधांमुळे तात्पुरता आराम मिळू शकतो, मात्र वेदनेचे मूळ कारण शोधण्याकडे दुर्लक्ष होते. तज्ज्ञांच्या मते, तीव्र पाठदुखीसोबतच गडद रंगाची किंवा फेसाळ लघवी, कारण नसताना सतत थकवा येणे, शरीरावर सूज येणे किंवा लघवीच्या सवयींमध्ये बदल होणे ही लक्षणे लपलेल्या किडनी ट्युमरचीही असू शकतात. त्यामुळे वेळेत निदान आणि उपचार करणे रुग्णाच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.(फोटो सौजन्य – istock)
मोठ्या प्रमाणावर लोक गंभीर पाठदुखीच्या समस्येने त्रस्त आहेत, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर आणि एकूण आरोग्यावर परिणाम होतो. दुर्दैवाने, पाठदुखी केवळ चुकीच्या बसण्याच्या पद्धतीमुळे, दीर्घकाळ काम केल्यामुळे किंवा वाढत्या वयामुळेच होत नाही, तर ती किडनी ट्युमरचेही लक्षण असू शकते.
झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. शिवम शिंगला म्हणाले की, “मूत्रपिंडामध्ये असामान्य पेशींची अनियंत्रित वाढ झाल्यास किडनी ट्युमर तयार होतो. सुरुवातीच्या टप्प्यात हे ट्युमर कोणतीही ठोस लक्षणे दाखवत नाहीत आणि अनेकदा नियमित आरोग्य तपासणी किंवा इतर कारणांसाठी केलेल्या इमेजिंग चाचण्यांदरम्यान योगायोगाने आढळून येतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय दीर्घकाळ आणि अति प्रमाणात वेदनाशामक औषधांचे सेवन केल्याने कालांतराने मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. काही औषधे मूत्रपिंडाकडे जाणारा रक्तपुरवठा कमी करतात, ज्यामुळे विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा किंवा आधीपासूनच मूत्रपिंडाचे विकार असलेल्या व्यक्तींमध्ये मूत्रपिंडाच्या दुखापतीचा धोका वाढतो.”
डॉ. शिंगला पुढे म्हणाले, “अनेक रुग्ण सतत होणारी पाठदुखी ही केवळ स्नायू किंवा मणक्यांशी संबंधित समस्या आहे असे समजतात. मात्र, जर पाठदुखीसोबत लघवीत रक्त येणे, फेसाळ लघवी होणे, कारण नसताना वजन कमी होणे, सतत थकवा जाणवणे किंवा पायांवर सूज येणे अशी लक्षणे दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ही लक्षणे लपलेल्या किडनी ट्युमरची असू शकतात. साधारणपणे दर महिन्याला सतत पाठदुखी, स्वतःहून औषधे घेण्याची सवय आणि फेसाळ लघवी या तक्रारींसह येणाऱ्या ४० ते ५० वयोगटातील १० पैकी सुमारे ३ ते ४ रुग्णांमध्ये मूत्रपिंडाशी संबंधित समस्या आढळतात आणि काही प्रकरणांमध्ये किडनी ट्युमरही निदान होतो. उपचार न केल्यास किडनी ट्युमरमुळे मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो आणि रुग्णाचे एकूण आरोग्य अधिक बिघडू शकते. वेळेवर तपासणी केल्यास मूत्रपिंडातील विकृती सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखता येते आणि उपचार अधिक यशस्वी होतात. किडनी ट्युमरचा उपचार त्याचा आकार, प्रकार आणि अवस्था यावर अवलंबून असतो. उपचारांमध्ये प्रभावित मूत्रपिंडाचा काही भाग किंवा संपूर्ण मूत्रपिंड काढण्यासाठी शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीचा समावेश असू शकतो. काही रुग्णांमध्ये टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपीचाही सल्ला दिला जातो.”
डोंबिवली येथील एआयएमएस रूग्णालयातील कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ. सचिन गुप्ता म्हणाले, “सध्या दर महिन्याला ४० ते ५० वयोगटातील १० पैकी सुमारे २ रुग्ण वारंवार होणारी पाठदुखी, लघवीच्या रंगामध्ये बदल आणि वेदनाशामक औषधांवर अवलंबून राहणे यांसारख्या इशारा देणाऱ्या लक्षणांसह येतात. तपासणी केल्यानंतर त्यांच्यामध्ये लपलेले किडनी ट्युमर आढळून येतात, ज्यासाठी पुढील तपासणी आवश्यक असते. अनेक किडनी ट्युमरचे वेळेवर निदान झाल्यास यशस्वी उपचार शक्य असतात. त्यामुळे लक्षणे गंभीर होण्याची वाट न पाहता त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. योग्य वेळी निदान झाल्यास मूत्रपिंडाची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यास आणि उपचारांचे परिणाम अधिक चांगले होण्यास मदत होते.”
Ans: थकवा, पायांना किंवा चेहऱ्यावर सूज येणे, लघवीच्या प्रमाणात बदल, वारंवार लघवी होणे, भूक कमी होणे, मळमळ किंवा रक्तदाब वाढणे अशी लक्षणे दिसू शकतात.
Ans: काही वेळा किडनी ट्युमरची सुरुवातीला स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. मात्र लघवीत रक्त येणे, कंबर किंवा पाठीच्या बाजूला सतत दुखणे, वजन कमी होणे किंवा सतत थकवा जाणवणे अशी लक्षणे आढळू शकतात.
Ans: रक्त तपासणी, लघवी तपासणी, अल्ट्रासाऊंड किंवा इतर वैद्यकीय तपासण्यांच्या मदतीने किडनीची स्थिती तपासली जाऊ शकते.






