एसटीच्या आरक्षणाला पसंती (फोटो सौजन्य-X)
मुंबई : स्वस्तातील प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या एसटी बसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. उन्हाळी सुट्टीत खासगी ट्रॅव्हल्सचे दर गगनाला भिडले होते. त्यामुळे मे महिन्यात एसटीच्या प्रवासी आरक्षणाचा टक्का वाढला. यंदाच्या मे महिन्यात १२ लाख ३३ हजार प्रवाशांनी आगाऊ आरक्षण करून एसटी प्रवासाला प्राधान्य दिले. महत्वाचे म्हणजे, ई-शिवाई आणि वातानुकूलित शिवनेरीतून प्रवासाला सर्वाधिक प्रवाशांनी प्राधान्य दिले आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस अर्थात एसटी राज्यभरात धावते. महिला, ज्येष्ठ नागरिकांना हाफ तिकिट तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासामुळे एसटीला प्रवासी प्राधान्य देत आहेत. तिकिट दरातील सवलतीमुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्यामुळे प्रवासी आगाऊ आरक्षण करुन आपली सीट आरक्षित करण्यावर भर देत आहेत. आगाऊ आरक्षण केल्याने प्रवाशांना आपल्या आवडीची सीट निवडता येते. त्यामुळे आगाऊ आरक्षणाकडे नागरिकांचा कल वाढतो आहे.
आगाऊ आरक्षणात 15 टक्के सवलत
आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी 1 जुलैपासून लवचिक भाडे योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तिकिट यंत्रणेत बदल करण्याचे काम सुरू आहे. योजनेमुळे आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना कमी गर्दीच्या हंगामात सुमारे 15 टक्के तिकीट दरात सवलत करणे शक्य होणार आहे. यामुळे एसटीचे आरक्षण करुन प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.