राज्यभरात रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. असाच अपघात पुण्यातील जेजुरी मार्गावरील शिंदवणे घाटात झाला आहे. घाटामध्ये टेम्पो उलटी झाल्यानंतर एका १८ वर्षीय मुलीचा या अपघातामध्ये मृत्यू झाला. तर टेम्पोमधील तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी रात्री १२ साडे बाराच्या आसपास घडला. अपघातामध्ये जखमी झालेल्या नागरिकांना लगेच उरळी कांचनमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शिंदवणे घाटामध्ये टेम्पोला अपघात झाल्याने एका १८ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला. पुजन झुब्बर पासवान असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. उमेष झुब्बर पासवान, दिलीप कुमार, झुब्बर रामाश्रय पासवान हे तिघंही अपघातामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या तिघांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उरळी कांचनमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुजन पासवान हिचे वडील झुब्बर रामाश्रय पासवान यांनी उरळी कांचन पोलीस स्थानकात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. वडिलांनी केलेल्या तक्रारीनुसार आरोपी चालक गौतम नामदेव मेमाणे यांच्याविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पुण्यातील उरळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झुब्बर पासवान आणि त्याची दोन मुले एक कामगार व टेम्पो चालक यांच्यासोबत भंगाराचे सामान घेऊन सासवड भागातून उरुळी कांचनकडे रात्री ११ वाजताच्या सुमारास निघाले होते. त्यानंतर रात्री साडे बाराच्या सुमारास टेम्पो शिंदवणे घाटामध्ये पोहचल्यानंतर गाडी चालक गौतम मेमाणे यांना रस्त्यावर असलेल्या वळणांनाच अंदाज न आल्याने गाडीवरचा चालकाचा ताबा सुटला आणि टेम्पोचा भीषण अपघात घडला. या अपघातामध्ये १८ वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
या भीषण अपघातामध्ये पुजन पासवान याच्या डोक्याला, हाताला मोठ्या जखमा झाल्या आहेत. तर एकाचा जागीच मृत्यू झाला. उमेष पासवान, झुब्बर पासवान, दिलीप कुमार व चालक गौतम मेमाणे अपघातामध्ये जखमी झाले आहेत. तर अपघातामध्ये जखमी झालेल्या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.