सोलापूर : जिल्हा परिषदेने स्वच्छतेच्या आषाढी वारी (Ashadhi Wari 2022) परंपरेला छेद दिला आहे. सोलापूर जि.प. सीईओंसह २० हजार अधिकारी कर्मचारी स्वच्छतेपासूून गायब असल्याची चर्चा जोर धरली आहे. पंढरी वारी संपल्या नंतर जि.प. सीईओंसह अधिकारी स्वःत हाती झाडू घेऊन स्वच्छता करत असतात. यंदा मात्र फक्त दिखाऊपणा झाल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. पारंपारिक अधिकाऱ्यांच्या स्वच्छता मोहिमेला छेद दिल्याचे ग्रामीण भागातून बोलले जात आहे.
प्रशासनातर्फे पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी निर्मल वारीचा डंका पिटवला गेला. पालखी सोहळ्यादरम्यान हा उपक्रम चांगला राबवला गेला. पण यात्रा पार पडल्यानंतर मार्गावरील स्वच्छतेचा जिल्हा परिषदेला विसर पडल्याचे दिसून आले आहे.
कोरोना महामारीमुळे दोन वर्षानंतर यंदा प्रथमच आषाढी वारी सोहळा झाला. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. मानाच्या पालख्या व दिंड्यामध्ये वारकरी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्याचे दिसून आले. तुकोबाराय व माऊलीच्या पालखी सोहळ्याच्या मार्गावर जिल्हा परिषद प्रशासनातर्फे निर्मल वारीचा प्रयोग दरवर्षी राबवला जातो. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांना स्वच्छतागृहाची सेवा पुरवण्यासाठी तात्पुरत्या स्वच्छतागृहासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी पुरवला जातो.
आषाढीवारी दरम्यान निर्मलवारी हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो. तो यंदाही चांगल्या पद्धतीने राबविला गेला. याचे मान्यवरांनी कौतुक केले. पण वारी पार पडल्यानंतर जिल्हा परिषदेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांतर्फे मार्गावरील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवली जाते. यावेळेस अशा स्वच्छता मोहिमेचे नियोजन झालेच नसल्याचे जिल्हा परिषद प्रशासनातील सूत्रांकडून सांगण्यात आले. दरवर्षीची परंपरा मोडल्याबद्दल काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याबाबत ‘नवराष्ट्र’शी बोलताना नापसंती ही व्यक्त केली आहे.
जबाबदारी कोणाची?
वारीनंतर स्वच्छता उपक्रम राबवायची याची जबाबदारी कोण घेणार हे जिल्हा परिषद प्रमुखांना सांगण्यात आलेच नाही. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी हे वारीदरम्यान आजारी पडले. त्यामुळे पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, ग्रामपंचायत आणि प्रशासन गाफीलच राहिल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी जिल्हा परिषदेतील सर्व कार्यालयात फेरफटका मारून वारी नंतरचे स्वच्छता मोहीम राबविण्याचे नियोजन आले आहे काय? याची खातरजमा केल्यावर याबाबत कोणाला काहीच कल्पना नसल्याचे दिसून आले.
काही जणांनी वारीदरम्यान पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे या उपक्रमाचे गरज वाटत नसल्याचे सांगितले. काही जणांनी हा उपक्रम गरजेचा होता, कारण परंपरा खंडित होता कामा नये अशीही प्रतिक्रिया दिली. पालखी मार्गावर कचरा साठलेला असतो तो अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदानाने गोळा करून स्वच्छता अभियान यशस्वी करता आले असते असेही सांगण्यात येत आहे. पाऊस असला तरी याबाबत आधीपासूनच नियोजन होणे गरजेचे होते अशाही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.