
Maharashtra Breaking News Updates Today
03 Aug 2026 10:16 AM (IST)
तुम्ही फ्री फायर मॅक्स प्लेअर आहात का? तर आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेमिंग कंपनी गरेनाने फ्री फायर मॅक्स खेळणाऱ्या प्लेअर्ससाठी 3 ऑगस्टचे रिडीम कोड्स जारी केले आहेत. या रिडीम कोड्सच्या मदतीने प्लेअर्सना एकही डायमंड खर्च न करता विविध रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. कोड्स रिडीम करून प्लेअर्स स्किन्स, स्टाइलिश बंडल्स, गन स्किन्स आणि इतर एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स मोफत अनलॉक करू शकणार आहेत. पण हे कोड्स मर्यादित काळासाठी व्हॅलिड असतात. त्यामुळे जर तुम्हाला रिडीम कोड्सद्वारे रिवॉर्ड्स क्लेम करायचे असतील तर तुम्हाला घाई करावी लागणार आहे.
03 Aug 2026 10:07 AM (IST)
भिवंडीतील इमारत दुर्घटनेनंतर कल्याण-डोंबिवलीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात तब्बल ६६१ इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या असून, त्यापैकी २०४ इमारती अतिधोकादायक श्रेणीत आहेत. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या २०४ अतिधोकादायक इमारतींपैकी १४३ इमारतींमध्ये अद्याप नागरिक वास्तव्यास आहेत. त्यामुळे या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. उर्वरित ६१ अतिधोकादायक इमारती रिकाम्या आहेत. अतिधोकादायक इमारतींची दुरुस्ती करणे शक्य नसल्याने त्या पाडणे हाच पर्याय आहे
03 Aug 2026 09:45 AM (IST)
PIMPRI CRIME: पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी परिसरातील 'करिष्मा ग्लोरी सोसायटी'मध्ये एक अत्यंत वेदनादायक आणि धक्कादायक घटना घडली आहे. आर्थिक विवंचनेतून एकाच कुटुंबातील तिघांनी सामूहिकरित्या आपले जीवन संपवले. या घटनेत विनोद पिल्ले (वय ५०), त्यांची पत्नी सिरजा पिल्ले (वय ४५) आणि मुलगी पौर्णिमा पिल्ले (वय १९) या तिघांचा मृत्यू झाला आहे. विनोद पिल्ले यांचा पहिल्या दिवशीच मृत्यू झाला होता, तर गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सिरजा व पौर्णिमा या माय-लेकींचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला.
03 Aug 2026 09:35 AM (IST)
PAKISTAN BLAST: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात पोलिसांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या एका भीषण आत्मघाती स्फोटात अनेकांचा मृत्यू झाला असून १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. स्वात जिल्ह्यातील एका शहरात शांतता रॅली सुरू असताना हा अचानक स्फोट घडवून आणण्यात आला. वृत्तसंस्था 'पीटीआय'ने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस एका संशयित हल्लेखोराची तपासणी करत असताना त्याने अंगावरील स्फोटकांचा स्फोट घडवून आणला. हा हल्ला घडवून आणणाऱ्या आत्मघाती हल्लेखोराबद्दल अधिकृत तपशील गोळा करण्याचे काम सुरू आहे.
03 Aug 2026 09:25 AM (IST)
BOMBAY HIGH COURT: सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेशी संबंधित एका अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने मोठा निर्णय दिला आहे. यापुढील काळात सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना (सरकारी डॉक्टरांना) शासनाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय खासगी प्रॅक्टिस करता येणार नाही, असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.
03 Aug 2026 09:15 AM (IST)
MAHARASHTRA POLITICS: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना अचानक वेग आला आहे. देशातील तरुणांचे मन वळवण्यासाठी भाजपकडून विविध उपक्रम राजीनामा नाट्यानंतर हाती घेण्यात आले असून, आता राज्यातही भाजप आपली पकड मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोर्चेबांधणी करत आहे.
मित्रपक्षांसह विरोधकांना मोठा धक्का
या राजकीय हालचालींचा भाग म्हणून भाजपने मित्रपक्षांसह विरोधकांना मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस पक्षांतील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
03 Aug 2026 09:05 AM (IST)
BIHAR TRAIN FIRE: बिहारमधील सहरसा जिल्ह्यातील सिमरी बख्तियारपूर रेल्वे स्टेशनवर पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. समस्तीपूर-सहरसा (६३३४४) पॅसेंजर ट्रेनच्या इंजिनला पहाटे ३ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. इंजिनला लागलेल्या आगीची तीव्र धग आणि धूर चार ते पाच डब्यांपर्यंत पोहोचल्याने ट्रेनमधील प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट उडाली. प्रसंगावधान राखत आणि जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी खिडक्या व दारांतून बाहेर उड्या मारण्यास सुरुवात केली. या अचानक घडलेल्या घटनेमुळे रेल्वे स्थानकावर काही काळ मोठ्या प्रमाणावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
03 Aug 2026 08:55 AM (IST)
India Share Market Update: ३ ऑगस्ट रोजी आज भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीच्या ट्रेंडनेही भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-अप सुरुवातीचे संकेत दिले. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा १३७ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, सुमारे २४,५८९.५ वर ट्रेड करत होता.
03 Aug 2026 08:51 AM (IST)
ठाणे: ठाणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे-भिवंडी मार्गावरील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे आणखी एका निष्पाप नागरिकाचा जीव गेला आहे.
राहणाळ गावाजवळ रस्त्यातील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात दुचाकी घसरल्यानंतर 46 वर्षीय महिलेचा मागून येणाऱ्या ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या अपघातात महिलेचे पती जखमी झाले असून, या घटनेनंतर रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Maharashtra to National And International Breaking News:
Maharashtra Religion Conversion Law: ‘राज्य सरकारने तयार केलेल्या ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला’ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्रातील धर्मांतरासंदर्भातील महत्त्वाचा ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, 2026’ आता अधिकृतपणे लागू झाला आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर झालेल्या या विधेयकाला राज्यपालांनंतर राष्ट्रपतींचीही मंजुरी मिळाली असून, 30 जुलैच्या राजपत्रात तो प्रकाशित करण्यात आला आहे. त्यामुळे या विधेयकाचे आता कायद्यात रूपांतर झाले आहे.