औरंगाबाद : शहरात कुरीयरने एक नव्हे तब्बल ३७ तलवारी (Sword order By Currier) मागवण्यात आल्याची उघडकीस आली आहे. या प्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी निराला बाजार येथील डीटीडीसी कुरिअरवर (DTDC Courier) छापा मारत पार्सल सर्व ३७ तलवारी जप्त केल्या. या तलवारी मागवणाऱ्या शोध सुरू असून या अगोदरही अशा तलवारी मागवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सहायक पोलिस आयुक्त (शहर विभाग) अशोक थोरात यांना खबऱ्या मार्फत कुरिअरने शहरात तलवारी आल्याची माहिती मिळाली. यावरून क्रांती चौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. गणपत दराडे, उपनिरीक्षक विकास खटके, प्रभाकर सोनवणे यांच्या पथकाने निराला बाजार येथील डीटीडीसी कुरिअरच्या कार्यालयावर छापा टाकला. तेथील व्यवस्थापक वाल्मिक जोगदंड यास माहिती विचारली असता, असे कोणतेही पार्सल आले नसल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी कार्यालयात पाहणी केली असता पार्सल बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणावर तलवारीचा साठा आढळून आला. एकूण सात ग्राहकांनी या तलवारी मागवल्या होत्या. यात पाच औरंगाबादचे असून दोघे जालन्याचे आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक डॉ. दराडे यांनी दिली.