७१ लाख बेरोजगारांच्या हाताला कामच नाही, राज्यात बेरोजगारी वाढतेय
एकीकडे देशातील गरिबी घटून देशात फक्त ५.३ टक्केच गरीब उरल्याबाबत जागतिक बँकेकडून जाहीर झालेली आकडेवारी तर देशातील बेरोजगारीचा दर ७.७ टक्क्यांवरून ६.९ टक्क्यांवर घसरल्याबाबत सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचा आलेला अहवाल देशातील गरिबी आणि बेरोजगारी घटल्याचे सांगत असतानाच दुसरीकडे मात्र राज्याच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राकडे जानेवारी २५ अखेरपर्यंत हाताला कोणतेच काम नसल्याने नोकरी मागण्यासाठी तब्बल ७१.७ लाख बेरोजगार तरुण-तरुणींनी नोंदणी केल्याची धक्कादायक बाब राज्याच्या आर्थिक पाहणीतून समोर आली आहे.
विशेष म्हणजे २०२४ मध्ये याच केंद्रात नोकरी व उद्योग मिळावा महणून नोंदणी केलेल्या उमेदवारांची संख्या १०.२१ लाख इतकी होती ही आकडेवारी बेरोजगारीचा आलेख किती झपाट्याने उंचावतोय हे दर्शविणारी आहे. माध्यमिक शाळांत परीक्षेपेक्षा कमी शिक्षण असलेल्या १८ लाख ९७१ जणांनी नोंदणी केली असून त्यापैकी ४ लाख ३८ हजार ६३४ स्त्रिया आहेत. दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांमध्ये १४ लाख ४७ हजार ८१३ जणांचा समावेश असून त्यामध्ये ४ लाख ९३९ स्त्रिया आहेत. बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या १५ लाख ५७ हजार ३०० जणांनी रोजगारी केली आहे.
अभियांत्रिकी-तंत्रज्ञान, वैद्यकीय पदविकाधारक याच केंद्रात अभियांत्रिकी-तंत्रज्ञान, वैद्यकीय, डीएमएलटी व औषध निर्माण तसेच इतर पदविका धारक असलेल्या ३ लाख ४ हजार ७३४ जणांनी नोंदणी केली. त्यामध्ये १ लाख ६२ हजार ४४ स्त्रियांचा समावेश आहे. अभियांत्रिकी-तंत्रज्ञान, वैद्यकीय, आणि इतर पदवीधर असलेल्या ९ लाख ८६ हजार ४८३ जणांनी नोंदणी केली, पैकी ३ लाख ४३ हजार ९१५ स्त्रिया आहेत. तसेच अभियांत्रिकी-तंत्रज्ञान, वैद्यकीय व इतर विषयात पदव्युत्तर पदवीधर असलेल्या १ लाख ८८ हजार ६०१ जणांनी नोंदणी केली असून त्यापैकी ७० हजार ९५ महिला आहेत.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आकडेवारी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताआयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार राज्यातील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांमध्ये नोंदणी झालेल्या व्यक्तींची संख्या, अधिसूचित केलेली रिक्त पदे व प्रत्यक्षात भरलेली पदे यावर नजर टाकल्यास रिक्त पदे भरण्यास चालढकल का केली जात आहे हे मात्र अनाकलनीय आहे. सन २०२४ मध्ये नोंदणी झालेल्या व्यक्तीची संख्या १० लाख ११ हजार इतकी होती. तर तेव्हा १० लाख ९३ हजार पदे रिक्त दर्शविण्यात आली होती. मात्र त्या वर्षात फक्त २ लाख २७हजार पदे भरण्यात आली. त्यामुळे ७ लाख ६३ हजार पदांचा अनुशेष तसाच कायम राहिला. सन २०२३ मध्ये ६ लाख ६४ हजार जणांनी नोंदणी केली तेव्हा रिक्त पदांची संख्या ८ लाख ८१ हजार दर्शवण्यात आली होती. त्यापैकी २ लाख ६३ हजार पदे भरण्यात आली, त्यामुळे ६ लाख २७ हजार उमेदवार नोंदवहीत कामाशिवाय तसेच राहिले.