नीरा नदीत आंघोळ करताना 20 वर्षीय तरूण पाण्यात बुडाला; शोधमोहिम युद्धपातळीवर सुरु
अकलुज : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात अकलूज येथे दुर्दैवी घटना घडली. नीरा नदीत आंघोळ करत असताना एक तरुण बुडाला. आकाश ऊर्फ गोविंद नामदेव फोके (वय २०, रा. झिरपी, ता. अंबड, जि. जालना) असे या तरुणाचे नाव आहे. सध्या त्याला शोधण्यासाठी शोधमोहिम सुरु आहे. ही घटना मंगळवारी (दि.1) सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
आकाश फोके हा आपल्या आजी प्रयागा प्रभाकर खराबे यांच्यासोबत देहूपासून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील रथामागील बारा क्रमांकाच्या हातगावकर दिंडीमध्ये सहभागी झाला होता. अंबड तालुक्यातील अनेक वारकरी या दिंडीत सहभागी आहेत. सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करत असताना अकलूजजवळ नीरा नदीच्या घाटावर आंघोळीसाठी थांबले होते. घटनेबाबत प्रत्यक्षदर्शी राहुल अशोक ठोंबरे याने सांगितले की, “आंघोळ करून काठावर उभा होतो. तेवढ्यात पाण्यात एक मुलगा बुडत असल्याचे लक्षात आले. मी तात्काळ पाण्यात उडी मारली. त्याच्या हाताला पकडले पण नदीच्या प्रवाहामुळे मीही बुडू लागलो आणि तो माझ्या हातातून सुटून गेला.”
हेदेखील वाचा : माण नदीवरील बंधाऱ्यावरून पायी जाणारा तरूण बुडाला; पोलिसांसह पालिकेकडून शोध सुरू
दरम्यान, ही घटना घडली तेव्हा संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातील नदीच्या पलीकडे सराटी येथे मुक्कामी होता. आकाशचे वडील नामदेव फोके हे शेतकरी आहेत. स्थानिक प्रशासन, पोलिस व बचाव पथकांनी शोधकार्य सुरू केले असून, परिसरात खळबळ उडाली आहे. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांमध्येही या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेदेखील वाचा : सोलापूर जिल्ह्यात संत तुकाराम महाराज पालखीचे आगमन; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पादुकांचे पूजन
नेरळ परिसरात चौघे बुडाले
नेरळ परिसरात असणाऱ्या पाषाणे या धरणावर दिघी, नवी मुंबई येथील चार तरुण मित्र शनिवारी सायंकाळी पर्यटनास आले होते. ते आंघोळीसाठी धरणात उतरले असता अजय विष्णू रावत (वय 28) हा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडाला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध न लागल्याने खोलीच्या हेल्प फाउंडेशनच्या टीमला पोलिसांनी बोलावले व रविवारी सकाळी नऊच्या सुमारास अजयचा मृतदेह शोधण्यात त्यांना यश आले.