कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, मुंबई – गोवा महामार्गावर 3 दिवस चार तासांचे ब्लॉक (फोटो सौजन्य-ट्विटर)
Mumbai Goa Highway News in Marathi : तुम्ही मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण, उद्यापासून म्हणजेच गुरुवारपासून सलग ३ दिवस महामार्ग ४ तास बंद राहणार आहे. 11 ते 13 जुलै दरम्यान सकाळी आणि दुपारच्या वेळेत महामार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. कोलाडजवळील पुलाच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक विभागाच्या अप्पर पोलिस महासंचालकांनी याबाबतची वाहतुक अधिकसुचना जारी केली आहे.
महामार्ग वाहतूक पोलीस विभागाने संबंधित अधिसूचना जारी केली असून वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. कोलाड जवळील म्हैसदरा नदीवर नवीन पुल बांधण्यात येणार आहे.
पुल बांधणीसाठी 5 गर्डर टाकण्यात येणार आहेत. यासाठी 11 जुलै ते 13 जुलै या तीन दिवसात हा ब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 अश्या दोन टप्प्यात हे ब्लॉक घेतले जाणार आहे. याकाळात महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. यावेळी वाकण पाली मार्गाने माणगावकडे प्रवासी प्रवास करु शकतात.