डी. पी. जैन कंपनीच्या कास्टिंग यार्डमधील साहित्याला आग
कराड : पुणे-बंगलुरु आशियाई महामार्ग व कराडच्या उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या डी. पी. जैन कंपनीच्या धोंडेवाडी फाटा (ता.कराड) येथील कास्टिंग यार्डमधील साहित्याला गुरूवारी सकाळी आग लागली. या आगीत कास्टिंग यार्डमध्ये असलेले पाईप व अन्य साहित्य जळून खाक झाले. कराड नगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आले.
डी. पी. जैन कंपनीच्या माध्यमातून सध्या पुणे-बंगलुरु महामार्गाच्या रस्त्याचे व कोल्हापूर नाका ते नांदलापूर (कराड) येथील उड्डाणपुलाचे काम करण्यात येत आहे. उड्डाणपुलासाठी लागणारे सेंगमेंट बनवण्याचे काम याच कास्टिंग यार्डमध्ये करण्यात येत होते. तसेच कामासाठी लागणाऱ्या पीव्हीसी व अन्य प्रकारच्या पाईप व अन्य साहित्य त्याठिकाणी ठेवण्यात आले होते. गुरूवार (दि. ८) सकाळी अचानक येथील कास्टिंग यार्डमधील साहित्याला आग लागल्याची घटना घडली.
पीव्हीसी व अन्य प्रकारचे पाईप व साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडल्याने आकाशात मोठ्या प्रमाणात धुरांचे लोट उसळत होते. हे धुरांचे लोट पाहून याठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. प्रारंभी, येथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने कराड नगरपालिकेचे दोन अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आग विझवली. याबाबत रात्री उशिरापर्यंत कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.