कराडात प्रशासकीय कार्यालयासमोर अनोखे फराळ आंदोलन; प्रशासनाचा नोंदवला निषेध
कराड : कापिल गावातील बोगस मतदानप्रकरणी निवडणूक प्रशासनाविरोधात एका सामाजिक कार्यकर्त्याने सुरु केलेल्या आंदोलनाला बुधवारी १४ वा दिवस पूर्ण झाला. या दिवशी त्यांनी प्रशासकीय कार्यालयासमोर अनोखे फराळ आंदोलन करून दिवाळीच्या सणातही आंदोलन करण्यास भाग पडल्याचे सांगत निषेध नोंदवला. त्यांच्या या अनोख्या फराळ आंदोलनाला अनेकांनी उपस्थिती लावली.
गेल्या दोन आठवड्यांपासून पवार यांनी बोगस मतदानाविरोधात धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या मते, कापिल गावात वास्तव्यास नसलेल्या व्यक्तींनी बनावट आधारकार्डच्या आधारे मतदान केले आहे. या प्रकरणी निवडणूक प्रशासनाने अशा नावांची तपासणी करून ती वगळण्याचे आदेश दिले होते. मात्र, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतील मतदार याद्यांमध्ये त्याच नावांचा पुन्हा समावेश झाल्याचे सांगत प्रशासनाच्या या या निष्काळजी व भोंगळ कारभारावर पवार यांनी बोट ठेवले.
तसेच दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी बुधवारी (दि.२२) ‘प्रार्थना आंदोलन’ घेऊन मारुती मंदिरासमोर दिवे प्रज्ज्वलन करून अधिकाऱ्यांना सद्बुद्धी यावी, अशी प्रार्थना करणार तर गुरुवारी (दि.२३) ‘भाऊबीज ओवाळणी आंदोलन’ करून बहिणींना आंदोलनस्थळी बोलावून लोकशाही रक्षणाचा संदेश देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.