कराडमध्ये एकाला मित्रांकडूनच मारहाण; एका मेसेजबद्दल विचारले अन्...
कराड : एका युवकाला त्याच्या मित्रांनीच हातातील कड्याने मारहाण केली. सैदापूर (विद्यानगर) येथील वाय. सी. कॉलेजवळ ही घटना घडली. याप्रकरणी निहाल मुख्तार इनामदार (वय 21, रा. पाडळी केसे, ता. कराड) याने कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी निहाल इनामदार हा उंब्रज येथील आशीर्वाद मायक्रो फायनान्समध्ये नोकरी करतो. त्याचे तोहिद पटेल (रा. जुनी पाडळी, ता. कराड) व केशव उर्फ कुणाल सावंत (रा. साळवी मळा, मुंढे, ता. कराड) हे मित्र असून, दोघांशी त्याचे पूर्वीपासून मैत्रीचे संबंध आहेत. 14 ऑक्टोबर रोजी दुपारी चारच्या सुमारास केशव व तोहिदनी त्याला तुझ्याकडे काम आहे, असे सांगून वाय. सी. कॉलेज येथे बोलावले.
निहाल तेथे पोहोचल्यावर केशवने त्याला एका मेसेजबद्दल विचारत कानाखाली मारली. त्यावर निहालने प्रतिकार केला असता, दोघांनी मिळून त्याच्यावर हातातील कड्या काढून डोक्यावर व चेहऱ्यावर वार केले. त्यानंतर दोघांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली व ‘तू जर केस केलीस, तर तुला ठार मारेन’ अशी धमकी दिली.
दरम्यान, निहाल उपचारासाठी दवाखान्यात गेल्यानंतर तोहिद पटेलने निहालच्या बहिणी शिफा इनामदार हिलाही जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी निहाल इनामदारचा जबाब नोंदवून तोहिद पटेल व केशव सावंत या दोघांविरुद्ध मारहाणीचा व धमकीचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस तपास करत आहेत.