चाकण येथे खाजगी बसची एसटीला जोरदार धडक; 13 जण जखमी(संग्रहित फोटो)
पिंपरी : चाकण येथील कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेल्या खाजगी बसने एसटी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात खाजगी बसमधील 13 जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी (दि.16) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देहू फाटा येथे घडली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथील खाजगी कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन खाजगी बस देहू फाटा येथून जात होती. दरम्यान, परळ डेपोच्या एसटी बसला खाजगी बसने पाठीमागून धडक दिली. या अपघातात खाजगी बसमधील 13 जण जखमी झाले आहेत. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
हेदेखील वाचा : Akola Crime : अकोल्यात एमडी ड्रग्स तस्करी; २ आरोपी अटकत, तर फरार आरोपी हा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता
सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच एसटी बसमधील प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. या अपघाताचा तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
एकाच ठिकाणी दहा अपघात
दुसऱ्या एका घटनेत, पुण्यात काही दिवसांपूर्वीच एका मार्गावर तेही एकाच ठिकाणी गेल्या तीन तासात तब्बल दहा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण या अपघाताला जबाबदार कोण असा संतप्त सवाल नारिकांनी विचारला जात आहे.
अपघाताच्या वाढत आहेत घटना
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील देहू ते येलवाडी मार्गावर हे दहा अपघात एकाच ठिकाणी झाले आहेत. या मार्गावर प्रचंड खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघात घडू शकतो आणि एखाद्याचा त्यात नाहक बळी जाऊ शकतो म्हणून स्थानिकांनी खड्डे बुजवण्याची विनंती केली. तर प्रशासनाने मलमपट्टी म्हणून या खड्ड्यात मुरूम आणून भरला. मात्र, पावसामुळे त्या मुरमाचा चिखल झाला आणि तो रस्त्यावर पसरला. या चिखलामुळे दुचाकीस्वार एकामागोमाग एक घसरून जखमी होत आहेत. त्यानंतर आता कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेल्या खाजगी बसने एसटी बसला जोरदार धडक दिल्याचे समोर आले आहे.