अकोला: अकोल्यातील पोलिसांनी एमडी ड्रग्स तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल २ लाख ३० हजार रुपयांचं एमडी ड्रग्स (46.30 ग्रॅम) जप्त करण्यात आलं आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक बीएएमएस दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. तर फरार आरोपी ‘गब्बर जमादार’ हा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आहे आणि पोलीस मित्र असल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. ही कारवाई गौरक्षण रोड परिसरात खदान पोलिसांनी केली आहे.
काय घडलं नेमकं?
खदान पोलीस स्टेशन हद्दीतील आदर्श कॉलनी परिसरात दुचाकीवरून दोन जण एमडी ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खदान पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गौरक्षण रस्त्यावर सापळा रचला. संशयित दुचाकीस्वारांना थांबवून विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यांनतर त्यांची अंगझडती करण्यात आली. त्यादरम्यान त्यांच्याकडे एमडी ड्रग्सचा साठा आढळून आला.
एकूण 46 ग्रॅम 30 मिली ग्रॅमचा एमडी ड्रग्स जप्त करण्यात आला. बाजारभावानुसार याची किंमत अंदाजे 2 लाख 30 हजार रुपये इतकी आहे. दोन आरोपींना अटक केली आहे. मोहम्मद यासीन मोहम्मद आसिफ (वय 23) फिरदोस कॉलनी, गवळीपुरा, अकोला आहे. तो बीएएमएसच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे.
मुस्ताक खान हादीक खान (वय 47) तो गफुरवाला प्लॉट, अकोला आहे. हे दोघेही अकोल्यात अमली पदार्थ विक्रीसाठी आले असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. त्यांच्याकडून दोन मोटारसायकलीही जप्त करण्यात आल्या आहेत. एक आरोपी फरार आहे. फरार आरोपीचा नाव ‘गब्बर जमादार’ असे आहे. वंचित बहुजन आघाडीचा सक्रिय कार्यकता आहे. ‘पोलीस मित्र’ म्हणूनही त्याची नियुक्ती होती. अनेक मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्याचे फोटो देखील आहेत. त्याच्या अटकेसाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. कारवाईत सहभागी अधिकारी आणि अंमलदार पोलीस निरीक्षक मनोज केदारे, उपनिरीक्षक योगेंद्र मोरे, एएसआय दिनकर धुर, अंमलदार संजय वानखडे, रवि काटकर, विजय मुलनकर यांनी केली.
मित्रानेच दगडाने ठेचून केली मित्राची हत्या; दोघांनी एकत्र मिळून दारू प्यायली अन्…
कोल्हापूर : कोल्हापुरातील हुक्केरी तालुक्यात एका धक्कादायक घटना समोर आली. कणंगला येथे जीवलग मित्राचाच दगडाने ठेचून मित्राने खून केला. या घटनेने एकच खळबळ उडाली. आनंदा ऊर्फ देमानी सुरेश डुकरे (वय २०, रा. सेनापती कापशी, ता. कागल) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. आनंदाचे वडील सुरेश डुकरे हे मूळचे कर्नाटकातील कारवार जिल्ह्यातील होमनाळी गावचे रहिवासी आहेत. गवंडी कामाच्या निमित्ताने वीस वर्षांपूर्वी ते सेनापती कापशी येथे स्थायिक झाले. त्यांचा मुलगा आनंदा शाळा सोडून वडिलांसोबत गवंडी काम करत होता. आनंदाची संशयित अल्पवयीनशी मैत्री झाली. वर्षभरापासून संशयित अल्पवयीन हा आनंदाच्याच घरी जेवण व राहण्यासाठी होता.